Kolhapur: जोतिबावरील पहिल्या पाकाळणीला भाविकांची मोठी गर्दी, पाकाळणी म्हणजे नेमकं काय..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 03:21 PM2024-04-29T15:21:11+5:302024-04-29T15:23:16+5:30

यात्रेनंतर येणारा रविवार पाकाळणीचा रविवार म्हणून ओळखला जातो

A large crowd of devotees on the first pakalani on Jotiba | Kolhapur: जोतिबावरील पहिल्या पाकाळणीला भाविकांची मोठी गर्दी, पाकाळणी म्हणजे नेमकं काय..जाणून घ्या

Kolhapur: जोतिबावरील पहिल्या पाकाळणीला भाविकांची मोठी गर्दी, पाकाळणी म्हणजे नेमकं काय..जाणून घ्या

जोतिबा : रविवारी जोतिबा डोंगर येथे मिनी चैत्र यात्रा पार पडली. यात्रेनंतरचा पहिलाच रविवार असल्याने रविवारी भाविकांनी जोतिबा डोंगरावर लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवून श्री जोतिबाचे गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत दर्शन घेतले. यात्रेनंतर येणारा रविवार पाकाळणीचा रविवार म्हणून ओळखला जातो.

चैत्र यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य यात्रेदिवशी यात्रेचा सोहळा पार पडतो. परंतु यात्रा संपते न संपते तोच ‘पाकाळणी, चोकाळणी’ असे जूनपर्यंत भाविक पालखी सोहळ्यासाठी येत असतात. तसेच दर्शन, पूजाअर्चा, महाभिषेक व नवस फेडण्यासाठी भाविक गुलाल-खोबरे उधळण्यासाठी येतात. त्यामुळे लाखो भाविक रविवारी व इतर दिवशी, असे जूनपर्यंत येऊन ‘श्रीं’चे दर्शन घेत असतात. चैत्र यात्रा झाली की, पहिली पाकाळणीनंतर दुसरी पाकाळणी होते. पाकाळणीसाठी सासनकाठ्या, हलगी, सनई, ढोल-ताशांच्या गजरात येत होत्या, तर असंख्य भाविक बैलगाड्या घेऊन भाविक परंपरेनुसार पाकाळणीसाठी आले होते.

दरम्यान, पहाटे घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. त्यानंतर ४ ते ५ या वेळेत ‘श्रीं’ची महापूजा व काकडआरती झाली. त्यानंतर श्री जोतिबाबरोबर नंदी, महादेव, चोपडाई, रामलिंग, दत्त, काळभैरव, यमाई या देवतांना महाभिषेक, महापोशाख व अलंकार घालून त्यांची आकर्षक महापूजा बांधली. यावेळी जोतिबा मंदिरात धार्मिक विधी, मंत्रोच्चार, आरती, महानैवेद्य दाखवून धुपारती सोहळा झाला.

रात्री साडेआठ वाजता उंट, घोडा, वाजंत्री, म्हालदार, चोपदार, पुजारी, देवसेवक, कंचाळवादक, डवरी, ढोली, देवस्थान समिती, अधिकारी, कर्मचारी, सिंधीया ट्रस्ट अधिकारी, भक्तगण सोहळ्यासाठी लवाजमा निघाला. यावेळी पालखीची मंदिर प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर डवरी गीते, ढोली व झुलवे व सर्वांचे मानपान झाल्यानंतर तोफेची सलामी होताच पालखी सोहळा मंडपात आला व उत्सवमूर्ती श्रींच्या मंदिरात नेण्यात आली.

Web Title: A large crowd of devotees on the first pakalani on Jotiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.