राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:55 PM2024-04-29T12:55:21+5:302024-04-29T12:57:38+5:30

'शाहूंचा वारसा सांगणारे कदमबांडे भाजपच्या प्रचारासाठी आले याचे दु:ख'

It is sad that Rajvardhan Kadambande, who tells the legacy of Shahu came to campaign for BJP says Shahu Chhatrapati | राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती

राजर्षी शाहूंच्या रक्ताचे, विचारांचे आम्हीच वारसदार : शाहू छत्रपती

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचे, तसेच विचारांचे आम्ही वारसदार आहोत. परंतु, लोकसभेची निवडणूक लढवित असताना, याच घराण्यातील एक सदस्य, शाहूंच्या विचारांचा वारसा सांगणारे राजवर्धन कदमबांडे मात्र राजर्षींच्या विचारांच्या बरोबर उलटा व्यवहार करत असलेल्या भाजपच्या प्रचारासाठी येथे आले याचे दु:ख आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी एका पत्रकात म्हटले आहे.

मी शाहूंच्या विचारांचा, तसेच कायद्यानुसार रक्ताचाही वारसदार आहे. शाहू महाराज यांची कन्या राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांची कन्या शालिनीराजे यांचा मी पुत्र आहे, म्हणजे मीदेखील राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे, असे सांगत शाहू छत्रपती म्हणाले की, छत्रपती शहाजी यांनी रक्ताचा वारस म्हणूनच आम्हाला दत्तक घेतले. ही प्रक्रिया हिंदू लॉ ॲक्टनुसार पार पडली आहे. त्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी मान्यता देत शिक्कामोर्तब केले. एकदा दत्तक आलो म्हटल्यावर विचारांबरोबरच संपत्तीचा वारसदार होणे ही नैसर्गिक प्रकिया आहे.

कोल्हापुरकरांच्या प्रेमातूनच लोकसभेची उमेदवारी

दत्तक विधान झाल्यावर छत्रपती घराण्याचा वारसदार म्हणून जसे कायद्याने मान्यती दिली, तसेच कोल्हापूरच्या जनतेनेही आम्हाला स्वीकारले. आतापर्यंत बराच मान सन्मान दिला. याच प्रेमातून आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे मी जनतेशी एकरूप झालो आहे, असेही शाहू छत्रपती म्हणाले.

भाजपच्या प्रचारासाठी कदमबांडे आले याचे दु:ख

जाती-धर्मात तेढ निर्माण करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. ज्या शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी कार्य केले, त्याच्याविरुद्ध भाजप काम करत आहे, अशा विचारांच्या पक्षाचा प्रचार स्वत:ला शाहूंचे वारसदार म्हणवणाऱ्या राजवर्धन कदमबांडे यांच्याकडून केला जात आहे, याचे आपल्याला दु:ख होत असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: It is sad that Rajvardhan Kadambande, who tells the legacy of Shahu came to campaign for BJP says Shahu Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.