मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेची मेट्रो 1 ला नोटीस

By जयंत होवाळ | Published: April 29, 2024 07:26 PM2024-04-29T19:26:10+5:302024-04-29T19:26:27+5:30

मुंबई मेट्रो १ कडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे.

BMC Notice for Payment of Property Tax to Metro 1 | मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेची मेट्रो 1 ला नोटीस

मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेची मेट्रो 1 ला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेने ४६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीसाठी घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १ला नोटीस बजावली आहे. येत्या २१ दिवसात कर भरण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून मेट्रो व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी अद्यापही करभरणा केलेला नाही. २०२२-२३ या आर्थिक वर्षापर्यंतचा ४६१ कोटी १७ लाख ६१५ रुपयांचा मालमत्ता कर मेट्रो १ ने थकवला आहे.

मुंबई मेट्रो १ कडे मुंबईतील चार विभागांमधील एकूण २८ मालमत्तांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा कर थकीत आहे. त्यापैकी के (पश्चिम) विभागातील एकूण १८ मालमत्तांसाठी ३११ कोटी ७७ लाख ८५ हजार ६६८ रुपये; के (पूर्व) विभागातील ६ मालमत्तांसाठी ११६ कोटी २९ लाख १ हजार ५१ रुपये; एल विभागातील २ मालमत्तांसाठी १९ कोटी ४ लाख ६२९ रुपये आणि एन विभागातील २ मालमत्तांसाठी १४ कोटी ६ लाख १३ हजार २६७ रुपये इतका कर थकीत आहे. के (पश्चिम) आणि एल विभागातील मालमत्तांसंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने नोटीस जारी करण्यात आली असून, २१ दिवसांच्या आत मालमत्ता करभरणा करण्यास सांगितले आहे. तर, के (पूर्व) आणि एन विभागाकडून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेट्रोच्या चार विभागातील २८ मालमत्तांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १८ कोटी २९ लाख ३६ हजार ११ रुपये इतका कर आकारण्यात आला आहे.

..अन्यथा कठोर दंडात्मक कार्यवाही
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम मुदत २५ मे आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: BMC Notice for Payment of Property Tax to Metro 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो