नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान...

By संजय घावरे | Published: April 29, 2024 07:52 PM2024-04-29T19:52:00+5:302024-04-29T19:52:42+5:30

'मास्टर माईंड' नाटकाचे २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान; ४० हजार रुपयांचा भुर्दंड

election training in theatres, big loss of drama | नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान...

नाट्यगृहांमध्ये रंगतोय निवडणूक प्रशिक्षणाचा प्रयोग, नाटकाचे मोठे नुकसान...

मुंबई - सध्या चहूबाजूला निवडणूक आणि प्रचाराचे वातावरण आहे. याचा मोठा परिणाम मनोरंजन विश्वावर होत असताना नाट्यगृहांमधले नाटकांचे प्रयोगही रद्द होत आहेत. महाराष्ट्रातील नाट्यगृहांमधील नाटकांच्या तारखा निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी रद्द केल्या जात आहेत.

शनिवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सायंकाळी साडे चार वाजता 'मास्टर माईंड' या मराठी नाटकाचा प्रयोग होणार होता. निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी निर्माते अजय विचारे यांना नाट्यगृह व्यवस्थापनाकडून मिळाली. या नाटकासाठी जवळपास ३०० प्रेक्षकांनी बुकींग केले होते. त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन प्रयोग रद्द केल्याची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावी लागली. प्रेक्षकांना तिकिटांचे जवळपास १,५०,००० रुपये परत करावे लागले. 

याबाबत 'मास्टर माईंड'चे सूत्रधार श्रीकांत तटकरे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, शनिवारी 'मास्टर माईंड' नाटकाच्या तारखेला निवडणूक आयोगातर्फे प्रशिक्षणाची दोन सेशन्स करण्यात आली. त्यांची सेशन्स संपल्यावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रयोग सुरू करण्याची आमची तयारी होती. त्यानंतरचा 'यदा कदाचित रिटर्न्स' या आमच्याच नाटकाचा असल्याने अॅडजस्ट करणे शक्य होते, पण सेशन्स संपण्याची वेळ न समजल्याने प्रयोगच रद्द करावा लागला. त्यांची सेशन्स पावणे चार वाजताच संपली होती. याचा अगोदर अंदाज दिला गेला असता तर साडे चारचा प्रयोग थोड्या विलंबाने सुरू करणे सहज शक्य होते, असेही तटकरे म्हणाले. 
............................
४० हजार रुपयांचा खर्च वाया
वर्तमानपत्रांतील जाहिरातींसाठी २० हजार रुपये , सोशल मीडियासाठी आठ हजार रुपये, बुक माय शोचे चार्जेस आणि इतर खर्च मिळून ३५ ते ४० हजार रुपयांचा भुर्दंड बसला.
............................
२ लाख ७५ हजारांचे बुकींग गेले
१,५०,००० रुपयांचे बुकिंग अगोदर होते. त्या दिवशीचा प्रयोग सुरू होईपर्यंत २,७५,००० रुपयांचे बुकींग सहज झाले असते. यामुळे निर्मात्यांचे नुकसान झाल्याचे तटकरे म्हणाले.
..........................
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते-निर्माते प्रशात दामले याबाबत 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोग त्यांच्या अधिकाराअंतर्गत कोणत्याही नाटकाच्या प्रयोगाची तारीख रद्द करू शकते हा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. नाटकाची तारीख रद्द करण्याबाबत आमचे काही म्हणणे नाही, पण प्रयोग रद्द करण्याची तारीख २० दिवस अगोदर कळवायला हवी. नाटकाचे आॅनलाईन बुकिंग सुरू झाले, जाहिरात प्रकाशित झाली, तिकिटबारीवर बुकींग सुरू झाल्यावर एक-दोन दिवस अगोदर सांगून तारीख रद्द करणे योग्य नाही. या गोष्टींचा निर्मात्याला भुर्दंड पडतो आहेच, पण प्रेक्षकांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यावर विचार व्हायला हवा. संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलायचे तर आम्हा जवळपास सर्व निर्मात्यांच्या काही नाट्य प्रयोगांच्या तारखा रद्द केल्या आहेत. काहींच्या बदलाव्या लागल्या आहेत, पण त्या तारखा त्यांनी अगोदर सांगून काढलेल्या आहेत. अल्पावधीत प्रयोग रद्द झाल्याचा प्रकार 'मास्टर माईंड' या नाटकाच्या बाबतीतच घडल्याचेही दामले यांनी स्पष्ट केले.

Web Title: election training in theatres, big loss of drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.