रेल्वेतील बिर्याणी तापली, आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

By नरेश डोंगरे | Published: April 29, 2024 09:06 PM2024-04-29T21:06:49+5:302024-04-29T21:06:59+5:30

फुड पॉइजिंग झालेच कसे : विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश

Biryani in the train was hot, IRCTC officials felled inquiry | रेल्वेतील बिर्याणी तापली, आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

रेल्वेतील बिर्याणी तापली, आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

नागपूर: रेल्वेतील अंडा बिर्याणीतून झालेल्या विषबाधा प्रकरणाने मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, आज येथील शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली असून, त्यांना या संबंधाने विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

शुक्रवारी सकाळी यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या कॅटरिंगमधून पुरिवण्यात आलेली अंडा बिर्याणी खाल्ली अशा ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. ईटारसीजवळ प्रवाशांना पोटदुखी, मळमळ, ओकाऱ्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यानंतर कानपूर, झांसीमधून प्रवाशांवर उपचार सुरू झाले. दरम्यान, प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ दिल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात असताना या दाव्याची अशा पद्धतीने वाट लागल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जावी, अशीही मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी आज आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या कार्यालयात बोलवून त्याची चांगलीच झाडाझडती घेतल्याची चर्चा आहे. या गंभीर प्रकरणात कुणाची चूक आहे, त्यासंबंधीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

ठिकठिकाणच्या स्टॉलची तपासणी
अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागपूर विभागात येणाऱ्या अनेक रेल्वे स्थानकावरच्या फूड किचनमध्ये तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. नागपूर, बल्लारशाह, वर्धा, सेवाग्राम, आमला, बैतूलसह ठिकठिकाणच्या किचनमधून खाद्यपदार्थ कशा पद्धतीने तयार केले जातात, तेथील स्वच्छतेची स्थिती काय आहे, हे तपासण्यासोबतच तेथील विविध खाद्य पदार्थांचे नमूनेही घेण्यात आले आहे. हे नमूने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
-----------------
कंत्राटदारावर कारवाई करा
केवळ तपासणी आणि नमूने जप्तीवर न थांबता प्रशासनाने जनआहारचे स्टॉलच्या (कॅटरिंग) कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, त्याचे कंत्राट रद्द करून कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी दिली आहे. या प्रकरणात रेल्वे यात्री परिषदेच्या अध्यक्षांनी रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतल्याचे समजते. जनआहारचे कंत्राट भदोरिया नामक कंत्राटदाराकडे असल्याची माहिती आहे.

Web Title: Biryani in the train was hot, IRCTC officials felled inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर