'धर या पोराला' म्हणताच पाळीव कुत्र्याने घेतला चावा

By दत्ता यादव | Published: May 14, 2024 09:02 PM2024-05-14T21:02:38+5:302024-05-14T21:02:58+5:30

कुसावडेतील घटना; मालकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा

As soon as he said 'Dhar Ya Porala', the pet dog took a bite | 'धर या पोराला' म्हणताच पाळीव कुत्र्याने घेतला चावा

'धर या पोराला' म्हणताच पाळीव कुत्र्याने घेतला चावा

सातारा : मुले खेळत असताना पाळीव कुत्र्याच्या मालकाने 'धर या पोराला,' असे म्हणताच कुत्र्याने मुलाच्या मांडीचा चावा घेतला. हा धक्कादायक प्रकार सातारा तालुक्यातील कुसावडे येथे दि. १३ रोजी दुपारी दोन वाजता घडला. याप्रकरणी पाळीव कुत्र्याच्या मालकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तू (नाना) महाडिक (रा. कुसावडे, ता. सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुसावडे गावातील समाज मंदिराजवळील एका झाडाखाली मनोज देटके, सार्थक देटके, उत्कर्ष देटके (सर्व रा. कुसावडे) ही मुले खेळत होती. त्याचवेळी दत्तू महाडिक हा त्याचे पाळीव कुत्रे घेऊन शेतात निघाला होता. 'धर या पोराला,' असे म्हणताच पाळीव कुत्रा मनोज देटके याच्या अंगावर धावून गेला. त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले. घरी गेल्यानंतर हा प्रकार मुलांनी पालकांना सांगितला. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओमकार दत्तात्रय देटके (वय २३, रा. कुसावडे, ता. सातारा) याने बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पाळीव कुत्र्याचा मालक दत्तू महाडिक याच्यावर गुन्हा दाखल केला. सहायक फाैजदार दबडे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: As soon as he said 'Dhar Ya Porala', the pet dog took a bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.