नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा, निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव, आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या तिथीवर आज घटस्थापना नवरात्रारंभ
By दा. कृ. सोमण | Published: September 21, 2017 02:57 AM2017-09-21T02:57:10+5:302017-09-24T21:50:33+5:30
आज गुरुवार, २१ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा! आज घटस्थापना - नवरात्रारंभ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सण-उत्सवांची रचना किती कल्पकतेने केली आहे हे त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानंतरच समजते.
सर्व मंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी
नमो ऽस्तुते ।।
आज गुरुवार, २१ सप्टेंबर, आश्विन शुक्ल प्रतिपदा! आज घटस्थापना - नवरात्रारंभ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या सण-उत्सवांची रचना किती कल्पकतेने केली आहे हे त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेतल्यानंतरच समजते. हे सण आता केवळ धार्मिक राहिलेले नाहीत तर त्यांना सामाजिक- सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. प्राचीन कालापासून भारत हा शेतीप्रधान देश आहे. गणेश चतुर्थीला शेतात धान्य तयार होत असते. त्यामुळे त्या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करून धान्य देणाºया पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर येणाºया पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. नवरात्राच्या या दिवसांत शेतातून तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्रात दुर्गादेवीची म्हणजे आदिशक्तीची - निर्मितीशक्तीची पूजा केली जाते. पृथ्वीच्या निर्मिती शक्तीचाच नवरात्र हा एक उत्सव असतो.
नवरात्र शरद ऋतूमध्ये येते म्हणून याला ‘शारदीय नवरात्र’ असेही म्हणतात. शरद ऋतूमध्ये शेतातील धान्य घरात आल्यामुळे घर संपन्न होते. वसंतऋतूपेक्षा शरद ऋतू त्यादृष्टीने खूप संपन्न असतो. म्हणूनच आपण दुसºयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘जीवेत् वसंता: शतम्’ असे न म्हणता ‘जीवेत् शरद: शतम्’ असे म्हणतो.
नऊ ही ब्रह्मसंख्या
दुर्गादेवीचा हा नवरात्रौत्सव नऊ दिवसांचाच का? आठ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा का नाही, असा प्रश्नही विचारला जातो. निर्मितीशक्ती - आदिशक्ती आणि नऊ अंक यांचे एक नाते आहे. बी जमिनीमध्ये गेले की नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यानंतर नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते, नवरात्र हा मातृशक्तीचा, निर्मितीशक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव असतो म्हणून नवरात्र नऊ दिवसांचे असते.
आज घटस्थापना आहे. आज दुर्गादेवीच्या मूर्तीचे, नवार्ण यंत्राचे आणि ओली माती मातीच्या घटात ठेवून त्यात गहू किंवा इतर धान्य पेरून त्या घटाची षोडशोपचार पूजा करायची आहे, आज आश्विन शुक्ल प्रतिपदा सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे. तोपर्यंत घटस्थापना करावयाची आहे. समजा एखाद्याला या वेळेत शक्य झाले नाही, तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही. देवीच्या शेजारी दीप अखंड तेवत ठेवावा. तसेच देवीपुढे दररोज वाढत जाणाºया लांबीची फुलांची माळ बांधावी. नंतर आरती करून सप्तशतीचा पाठ वाचावा.
नवरात्राच्या नऊ दिवसांत उपवास करतात. उपवास केल्याने शरीरातील मांद्य निघून जाते. शरीर हलके बनते. त्यामुळे पूजा-उपासना करताना मनाची एकाग्रता साधणे सुलभ होते. आत्मशद्धीसाठी उपवास केला जातो. चित्त शुद्ध होते. मनात वाईट विचार येत नाहीत. काही उपासक नवरात्रात हलका आहार घेऊन उपवास करतात. तर काही भाविक केवळ फलाहारच करतात. तर काही एक वेळ जेवण घेतात. काही लोक फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काही भक्त निर्जळी म्हणजे पाणीही न पिता उपवास करतात. मात्र असे कडक उपवास करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही एक गोष्ट नीट समजून घ्या की उपवास हे अंतिम साध्य नाही. उपवास हे एक साधन आहे. शरीरास अपायकारक होईल असा उपवास करणे योग्य होणार नाही. या नऊ दिवसांत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर नियंत्रण ठेवावे. त्यामुळे तुमचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढत असतो. कारण कोणत्याही देवतेची पूजा करण्यामागे आपला एकच हेतू असावा तो हा की आपल्यात चांगला बदल व्हावयास हवा. आपण व्यसनी, भ्रष्टाचारी, आळशी, अज्ञानी, अंधश्रद्धेने ग्रासलेले असू तर पूजा केल्याने आपण निर्व्यसनी, नीतिमान, उद्योगी, ज्ञानी, वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करणारे व्हावयास हवे आहे. पूजा केल्याने आपण निर्भय व्हावयास हवे आहे. आपल्यात जर असा चांगला बदल जो आपल्याच हातात आहे तो जर झाला नाही, तर पूजा, उपासना करून काहीही साध्य होणार नाही. हे कलियुग आहे. इथे केवळ देवीची पूजा - उपासना करून काहीही साध्य होणार नाही. आपल्यात चांगला बदल करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. तसे नसते तर रोज मंदिरात देवीची पूजा करणारा पुजारी श्रीमंत झाला असता. त्याला जीवनात कोणताही प्रश्न राहिला नसता. या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत.
देवीमाहात्म्य
दुर्ग नावाच्या राक्षसाला देवीने ठार मारले म्हणून देवीला ‘दुर्गा’ हे नाव प्राप्त झाले. एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावयास हवी आहे. देवांपेक्षा देवी जास्त सामर्थ्यवान आहेत. पुराणातल्या सर्व कथा आपण वाचल्या तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे ज्या ज्या वेळी देवांवर संकटे आली त्या त्या वेळी देव देवींना शरण गेले; आणि देवींनी देवांना त्रास देणाºया दुष्ट राक्षसांना ठार मारले. त्यामुळेच देवांवरची संकटे दूर झाली. मी हे सर्व तुम्हाला का सांगतो? कारण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की पुरुषशक्तीपेक्षा स्त्रीशक्ती ही जास्त मोठी आहे. आपण हे समाजातही पाहतो. जेव्हा घरातील पुरुषाची काही कारणाने नोकरी जाते. तेव्हा त्या घरची स्त्री ही स्वत: निर्भयपणे बाहेर पडते. कधी कधी घरच्या पुरुषाला वाईट मित्रांच्या ( ? ) संगतीमुळे दारूचे - जुगाराचे व्यसन लागते त्या वेळी घरची स्त्री रडत, नवºयाचा मार खात बसत नाही. तर ती नवºयाला वठणीवर आणते किंवा नाइलाज झाला तर घरातून मुलांना घेऊन बाहेर पडते व स्वत: पैसे कमवून मुलांचा चांगला सांभाळ करते. आता काळ बदलला आहे; आणि अशा स्त्रीशक्तीचा साक्षात्कार व्हायला स्त्रियांचे शिक्षण कारणीभूत आहे. म्हणूनच आज घटस्थापनेच्या दिवशी आपण त्या दुर्गादेवीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना नमस्कार करू या. घरची स्त्री जर सुशिक्षित झाली तर ते घर तर सुधारेलच; शिवाय प्रत्येक घरची स्त्री जर शिकली तर सारा समाज सुधारेल. घराघरांत वावरणारी ही स्त्रीशक्ती देशाची प्रगती घडवू शकेल. मगच खºया अर्थाने नवरात्रौत्सव साजरा झाला असे म्हणता येईल.
म्हणून आज आपण देवीला नमस्कार करताना प्रार्थना करू या.
या देवी सर्वभूतेषु
स्त्रीशक्तीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
नमो नम: ।।