छावण्या चालविणा-या शेवगावमधील ३२ संस्थांविरुध्द गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 08:15 PM2018-02-28T20:15:59+5:302018-02-28T20:16:36+5:30
चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्याने तहसिलदारांच्या आदेशानुसार छावण्या चालविणा-या ३२ संस्था व संस्था चालकांच्या पदाधिका-यांविरूद्ध बुधवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
शेवगाव : तालुक्यात सन २०१२ ते सन २०१४ या कालावधीत कार्यरत असलेल्या चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळल्याने तहसिलदारांच्या आदेशानुसार छावण्या चालविणा-या ३२ संस्था व संस्था चालकांच्या पदाधिका-यांविरूद्ध बुधवारी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
या छावण्या चालविणा-या संस्था चालकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक असून यातील अनेक जण सध्या विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या संस्थाचालकांचे धाबे दणाणले असून या संस्था काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिल्याने यावर काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सदर संस्था काळ्या यादीत गेल्यानंतर त्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प होण्याबरोबरच या संस्थांना या पुढील काळात संस्थेमार्फत कोणतेही लाभ घेता येणार नाहीत. आज छावणी चालत असलेल्या संबंधीत गावांच्या मंडलाधिका-यांनी दिलेल्या फियार्दीनुसार पोलिसांनी कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या संस्था- श्री. स्वामी समर्थ सह. दुध उत्पादक संस्था - वडुले खुर्द , गणेश मोटर वाहतुक संस्था - दिंडेवाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित लोळेगाव, माळीवाडा (शेवगाव), आंतरवाली, प्रतिभा महिला मंडळ संचलित अमरापूर, आव्हाणे खुर्द, स्व. मारूतराव घुले पा. सार्वजनिक वाचनालय संचलित आव्हाणे, आव्हाणे बु. व ब-हाणपूर, श्रीराम ग्रामिण सह पतसंस्था - ढोरजळगाव, गणेश सेवाभावी सह. संस्था - वाघोली, प्रा. शिवाजीराव वांढेकर सार्वजनिक वाचनालय - सामनगाव, कानिफनाथ कृषी विज्ञान मंडळ - वडुले खुर्द, गणेश सहकारी दुध उत्पादक संस्था - ढोरजळगाव, उषकाल बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान - आखतवाडे, शंभुराजे युवक शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान - गहिले वस्ती (शेवगाव), शिवशक्ती ग्रामविकास संस्था - मळेगाव, सेवा सहकारी सोसायटी - आखतवाडे, मजले शहर वरूर, खरडगाव, नजिक बाभूळगाव, आनंद प्रतिष्ठान ठाकूर निमगाव व संचलित खरडगाव, शिवछत्रपती सहकारी दुधसंस्था - आखेगाव, श्री. स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय - अमरापूर, विकास ज्योत ग्रामविकास प्रतिष्ठान भुतेटाकळी संचलित कोनोशी, विठ्ठल सार्वजनिक ग्रंथालय - चापडगाव, जयभवानी सार्व. वाचनालय -भायगाव, यश बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था शेवगाव संचलित भातकुडगाव, नवनाथ ग्रामकृषी विज्ञान मंडळ - भायगाव.
कारवाईकडे लक्ष
दरम्यान, उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील इतर तालुक्यात छावणी चालकांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, शेवगावमधील काही संस्थाचालक न्यायालयात गेल्याने येथे गुन्हे दाखल करण्यास विलंब झाला असावा. मात्र, उशीरा का होईना हे गुन्हे दाखल झाल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.