लेखापरीक्षकांच्या बनावट सहीने ४० लाखांची बिले मंजूर; नगर महापालिकेच्या पथदिव्यांच्या कामात अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 07:42 PM2017-12-29T19:42:36+5:302017-12-29T19:43:05+5:30

नगर शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला.

40 lakh bills of the auditors; Disaster in the street work of Municipal Corporation | लेखापरीक्षकांच्या बनावट सहीने ४० लाखांची बिले मंजूर; नगर महापालिकेच्या पथदिव्यांच्या कामात अपहार

लेखापरीक्षकांच्या बनावट सहीने ४० लाखांची बिले मंजूर; नगर महापालिकेच्या पथदिव्यांच्या कामात अपहार

अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परीक्षकांच्या बनावट सहीने तब्बल ४० लाख रुपयांची बिले ठेकेदाराला अदा केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी उघडकीस आणला. अंदाजपत्रकीय नोंदवहीमध्ये (बजेट रजिस्टर) सदर कामाची कोणतीही नोंद नसताना बिले निघाल्याने हा अपहार संगनमताने झाल्याचा आरोपही बोराटे यांनी केला.
महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी दुपारी एक वाजता सभापती सुवर्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत पहिले दोन तास पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा झाली. राहिलेल्या एका तासात विषयपत्रिकेवरील विषय मंजूर झाले.
शहरातील भिस्तबाग महाल, तपोवन रोड परिसर (प्रभाग क्रमांक १) आणि मल्हार चौक, कायनेटिक चौक (प्रभाग क्रमांक २८) या परिसरात चालूवर्षी पथदिव्यांची कामे करण्यात आली. या कामांची महापालिकेच्या बजेट रजिस्टरमध्ये नोंद आढळून आली नाही. पथदिव्यांच्या बिलावर उपायुक्त, अभियंता, प्रभाग अभियंता, विद्युत विभागाचे प्रमुख, मुख्य लेखा परीक्षक यांच्या सह्या आहेत. पथदिवे बसविल्याची स्थळपाहणी करूनच बिले काढली, असा दावा अधिका-यांनी केला. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय स्थायीच्या विषयपत्रिकेवरील विषय मंजुरीला न घेण्याचा पवित्रा बोराटे यांनी घेतला. मात्र अधिकारी गप्प राहिले. बजेट रजिस्टर मिळविण्यासाठी सदस्यांना अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करावी लागली. महापौरांच्या स्वीय सहायकांनी सदरचे रजिस्टर अखेर स्थायीच्या सभागृहात आणले आणि त्यात पथदिव्यांच्या कामांची नोंद नसल्याचे आढळून आले.
पथदिव्यांच्या कामांची बिले मंजूर करताना त्याची अंदाजपत्रकात खतावणी झाली का याची खातरजमा करूनच मुख्य लेखापरीक्षक सह्या करतात. मात्र ४० लाख रुपयांच्या बिलांवर आपण सह्या केल्या नाहीत, असे स्पष्टकरण मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांनी दिल्याने अन्य अधिकारी गरबडून गेले. उपअभियंता आर. जी. सातपुते यांनीही त्या सह्या माझ्या नसल्याचे सभागृहाला सांगितले. त्यामुळे लेखा परीक्षकांच्या बनावट सह्या कोणी केल्या, याची चौकशी करण्याचे आदेश सभापती जाधव यांनी दिले.
प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याऐवजी दोषींवर थेट गुन्हा दाखल करण्याचा आग्रह सदस्य बोराटे, मुदस्सर शेख, सचिन जाधव यांनी लावून धरला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच आदेश सभापती जाधव यांनी दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

Web Title: 40 lakh bills of the auditors; Disaster in the street work of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.