भाजपा उपमहापौरांचे शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान; नगरमध्ये तणावपूर्ण स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 01:54 PM2018-02-16T13:54:25+5:302018-02-16T15:28:28+5:30
शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.
अहमदनगर- शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून, छिंदम यांच्या कार्यालयाची शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी प्रभागातील एका कामासाठी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कर्मचा-यांची मागणी केली होती. कर्मचारी न पाठविल्यामुळे त्यांनी आज (दि. १६) सकाळी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे याला फोन केला.
बिडवे यांच्याशी बोलताना छिंदम यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे, योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून छिंदम यांच्याविरोधात तक्रार दिली. त्याचवेळी छिंदम यांचे कार्यालय व घरासमारे शिवसैनिक, राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी छिंदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करत गाड्या फोडल्या. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपमहापौर छिंदम यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. महापालिकेतील उपमहापौर छिंदम यांचे कार्यालय फोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन छेडलं आहे.
पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांना पोलिसांनी अटक केली. त्याचवेळी माजी आमदार राठोड यांच्यासह शिवसैनिकही मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी छिंदम यांच्या अटकेची मागणी केली
या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली असल्याचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, शिवजयंती तोंडावर आलेली असताना भाजपच्या नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच उपमहापौर हे खासदार दिलीप गांधी गटाचे समर्थक असल्याने व मनपात शिवसेना व त्यांच्यात कायमचाच संघर्ष असल्याने भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेलाही आयते कोलीत मिळाले आहे.