अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:31 PM2018-01-29T18:31:57+5:302018-01-29T21:38:22+5:30

अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले होते.

A complaint has been lodged against Ahmednagar Municipal Corporation | अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देपोलिसांनी स्वतंत्र तपास करुन आज (सोमवार, दि. २९) सायंकाळी सहा वाजता दोन अधिकारी, एक लिपिक व एक ठेकेदार अशा चार जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला़ महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांनी फिर्याद दिली.विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सुपरवायझर बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे, ठेकेदार सचिन लोटके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर : महापालिकेतील पथदिव्यांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्युत विभागाचे प्रमुख तथा शहर उपअभियंता रोहिदास सातपुते आणि इलेक्ट्रीक सुपरवायझर बाळासाहेब सावळे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी स्वतंत्र तपास करुन आज (सोमवार, दि. २९) सायंकाळी सहा वाजता दोन अधिकारी, एक लिपिक व एक ठेकेदार अशा चार जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अहमदनगर महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांनी फिर्याद दिली.
महापालिकेमार्फत शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये ४० लाख रुपये खर्चाचे पथदिवे बसविण्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी २९ डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला होता. त्यावर ३० डिसेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन चौकशी आणि दोषी अधिका-यांच्या निलंबनाची मागणी केली होती. आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे आणि सहायक नगररचना संचालक संतोष धोंगडे यांची चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीचा अहवाल दोन्ही अधिका-यांनी गत गुरुवारी आयुक्तांना सादर केला. त्या अहवालाचा अभ्यास करून आयुक्तांनी विद्युत विभागाचे प्रमुख सातपुते आणि सुपरवायझर सावळे यांना दोषी ठरवले आहे. चौकशी सुरू असतानाच या दोन्ही अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे.
पथदिव्यांच्या चौकशी अहवालाबाबात आयुक्त मंगळे म्हणाले, पथदिव्यांच्या १९ कामात घोटाळा झाला आहे. मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात, उपायुक्त (सामान्य) विक्रम दराडे, शहरअभियंता विलास सोनटक्के, विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सुपरवायझर बाळासाहेब सावळे, लेखा विभागातील लिपिक लोंढे, बिले तयार करणारा भरत काळे यांचे चौकशीदरम्यान जबाब घेण्यात आले.
चौकशीचा अहवाल पोलिसांकडे सादर केला होता़ त्यावर पोलिसांनी स्वत: अधिका-यांची चौकशी केली़ त्यानंतर पोलिसांनी स्वतंत्र चौकशीचा अहवाल सोमवारी दुपारी सादर केला. त्यानुसार आयुक्त मंगळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, सुपरवायझर बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे, ठेकेदार सचिन लोटके यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी भरत काळे याला ताब्यात घेतले आहे.

तिस-याच दिवशी काढली बिले

दोन प्रभागांत पहिल्या दिवशी प्रस्ताव मंजूर, दुस-या दिवशी कामे पूर्ण आणि तिस-या दिवशी बिले काढण्यात आली. महापालिकेत सर्वांत वेगाने कामे पूर्ण झाल्याचे दिसते. या १९ कामांची वेगवेगळ्या तीन तारखांना कामे कशी झाली, याची सविस्तर माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

Web Title: A complaint has been lodged against Ahmednagar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.