जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 05:31 AM2024-05-03T05:31:54+5:302024-05-03T05:32:18+5:30

या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात कोपर्डी घटनेतील पीडित मुलीचा भाऊही आरोपींच्या यादीत आहे.

crime news Caste abuseYouth's suicide Kopardi case against three including victim's brother | जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

कर्जत (जि. अहमदनगर) : शालेय मुलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे गाजलेल्या कोपर्डी गावात मागासवर्गीय तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करून नंतर नग्न करत मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात कोपर्डी घटनेतील पीडित मुलीचा भाऊही आरोपींच्या यादीत आहे.

विठ्ठल ऊर्फ नितीन कांतीलाल शिंदे (३७, रा. हरणवस्ती, कोपर्डी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे वडील कांतीलाल शिंदे यांनी कर्जत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, १ मे रोजी कोपर्डी गावात भैरवनाथाच्या यात्रेतील तमाशात भांडणे झाली. त्यावेळी दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक या तिघांनी आपल्या मुलाला नाचण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे आपणाला गुरुवारी गावात समजले. त्यानंतर जवळच राहत असलेल्या आपल्या मुलाच्या घरी चौकशीसाठी गेलो असता तो रात्रीपासून घरी आला नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. थोड्या वेळाने आपला लहान मुलगा शांतीलाल याचा फोन आला व विठ्ठल स्मशानभूमीत नग्न अवस्थेत असल्याचे त्याने सांगितले. घरून कपडे पाठवून त्याला घरी आणले. यावेळी तमाशात नाचलो  म्हणून आपणास वरील तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर घरी येत असताना मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्न केले. या अपमानामुळे आपली जगण्याची इच्छा नाही, अशी हकीकत नितीनने सांगितली.

मृत कोपर्डीतील आरोपीचा चुलत भाऊ

 कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी शालेय मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणात जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे हा मुख्य आरोपी होता. त्याला फाशीची शिक्षा झाली. शिक्षा भोगत असताना त्याने आत्महत्या केली. गुरुवारी आत्महत्या केलेला विठ्ठल शिंदे हा या आरोपीचा चुलतभाऊ आहे.

 विठ्ठल हा बाबूलाल गोपाळ शिंदे यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या खिशात ‘माझे जीवन संपवत असून, या बाबीला बंटी बाबासाहेब सुद्रीक व स्वप्निल बबन सुद्रीक कारणीभूत आहेत’, असे लिहिलेली चिठ्ठी आढळली आहे.

Web Title: crime news Caste abuseYouth's suicide Kopardi case against three including victim's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.