नगरमधील चिमुकल्यांसाठी धावणार ड्रॅगन रेल्वे; महापालिकेच्या सभेत शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:00 PM2017-12-27T14:00:23+5:302017-12-27T14:01:55+5:30
भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात ड्रॅगन रेल्वे खेळणी बसविण्यात येणार आहे. नालेगाव परिसरात बेघरांसाठी निवारा उभारण्यात येणार आहे.
अहमदनगर : भुतकरवाडी येथील महालक्ष्मी उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात ड्रॅगन रेल्वे खेळणी बसविण्यात येणार आहे. नालेगाव परिसरात बेघरांसाठी निवारा उभारण्यात येणार आहे. यासह १६ विषयांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी (दि. २९) सभा बोलविण्यात आली आहे, अशी माहिती सभापती सुवर्णा जाधव यांनी दिली.
महालक्ष्मी उद्यानामध्ये हे खासगी ड्रॅगन रेल्वे बसविण्यास एकाने परवानगी मागितली होती. त्यानुसार उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात ५ हजार रुपये महिना व इतर काळात अडीच हजार रुपये महिना या दराने उद्यानातील जागा वापरण्यास देता येईल, असा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आला आहे. सदरची खेळणी नागरिकांसाठी खुली राहणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. कराराच्या काळात खेळणीस अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील, अशी करारनाम्यात तरतूद करण्यात येणार आहे. उद्यानातील महापालिकेची जागा भाड्याने देण्याचा हा प्रस्तावावर स्थायीत चर्चा होणार आहे. अशी जागा यापूर्वीही दिलेली होती.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरातील बेघरांना निवारा बांधण्यात येणार आहे. यासाठीची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, मे. बेस्ट कन्स्ट्रक्शन कंपनी यांची निविदा स्वीकारण्याची शिफारस छाननी समितीने केली आहे. १ कोटी ७७ लाख एवढा या निवारा इमारतीसाठीचा बांधकाम खर्च आहे. शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे इथे रात्रीच्या वेळी थांबणा-यांना या निवा-यामध्ये आसरा मिळणार आहे. एक रात्र मुक्काम, स्नानाची सोय असून, अपंगांसाठी तळमजल्यावर आसरा दिला जाणार आहे, असे सभापतींनी सांगितले. याशिवाय पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, इलेक्ट्रीक विभाग, मोटार व्हेईकल विभागात तात्पुरत्या स्वरूपात काम करणा-या कर्मचा-यांना तांत्रिक खंड देऊन पुन्हा नियुक्ती दिली जाणार आहे.