Ganesh Festival 2018 : उजळले रुप विशाल गणेशाचे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:18 PM2018-09-13T12:18:09+5:302018-09-13T12:18:17+5:30
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाचे रुप शेंदूर उटीने उजळले आहे. साडेबारा फूट उंच असलेली ही मूर्ती तेजस्वी झाली आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला झालेले हे विशाल गणपतीचे दर्शन विलोभनीय आहे.
अहमदनगर : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाचे रुप शेंदूर उटीने उजळले आहे. साडेबारा फूट उंच असलेली ही मूर्ती तेजस्वी झाली आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला झालेले हे विशाल गणपतीचे दर्शन विलोभनीय आहे.
अहमदनगर शहराचे श्री विशाल गणपती हे ग्रामदैवत. माळीवाडा भागात असलेली ही गणपतीची मूर्ती नावाप्रमाणेच विशाल म्हणजे साडेबारा फूट आहे. पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे. मूर्ती विशिष्ट मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे. दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापना झाल्याचे जाणकार सांगतात. मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे. शुभ्र संगमरवरी दगडातून घडलेले गर्भगृह, त्यावर सुंदर नक्षीकाम यामुळे मंदिराचे रुप मनमोहक झाले आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत पहिला मान या गणपतीला असतो.
गणेशाच्या मूर्तीवरील शेंदूराचा जुना लेप काढण्यात आला होता. त्यावेळी २६ महिने मंदिर बंद होते. ते गतवर्षीच्या गणेशोत्सवात उघडले. शुभ्र संगमरवरी दगड, त्यावरील नक्षीकाम आणि त्यावर सोडलेला प्रकाशझोत यामुळे मंदिराचे रुपच पालटले आहे. गणेशाच्या दर्शनासाठी येणारा भाविक प्रसन्न चित्ताने या मंदिरात रमतो. प्रथमच गर्भगृहाला चांदीचे दरवाजे बसविण्यात आले आहेत. चांदीचे मखर बसविण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी सांगितले.
ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी (१४ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. मंगळवारी फक्त महिलांसाठी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत ‘गणेशयाग’ होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी दिवसभर ‘अग्निहोत्र’होणार आहे.
गणेशाची मूर्ती पुरातन आहे. त्याचा इतिहास अद्याप तरी सापडला नाही. नवसाला पावणारा म्हणून गणपतीची ख्याती आहे. मिरवणुकीचा पहिला मान असतो. स्व. जगन्नाथ आगरकर यांच्या कल्पनेतून १९९२ मध्ये पहिल्यांदा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर गतवर्षी मंदिराचे सुशोभिकरण झाले. महाराष्ट्रात विशाल गणपतीच्या उंचीएवढी दुसरी कोणतीही गणपती मूर्ती नाही. अष्टविनायकांमध्येही अशी उंच मूर्ती नाही. भाविकांना मंदिरात आल्यानंतर वातावरण प्रसन्न होते.
- पंडितराव खरपुडे, उपाध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट