ग्रासरूट इनोव्हेटर : शेवग्याच्या शेंगा तोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या साथीला आले झेला यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:34 PM2018-12-24T12:34:32+5:302018-12-24T12:34:44+5:30
याद्वारे शेतकऱ्यांना शेंगा काढणे अगदी सोपे झाले आहे.
- अनिल लगड (अहमदनगर)
शेतकरी पारंपरिक शेती सोडून आता आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळले आहेत. पूर्वी बांधावर दिसणारा शेवगा आता शेतात आला आहे. शेवगा शेंगा काढणे अगदी जिकिरीचे काम असते. ठिसूळ झाड असल्याने अगदी अलगद या शेंगा काढाव्या लागतात. कोणतीही इजा न होता. शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने झेला विकसित केला आहे. याद्वारे शेतकऱ्यांना शेंगा काढणे अगदी सोपे झाले आहे.
शेवग्याच्या शेंगा, फुले, पाने शरीरासाठी आरोग्यवर्धक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेवग्याच्या झाडाच्या फांद्या कमकुवत असतात. यामुळे या झाडांवर माणसाला चढता येत नाही. त्यामुळे खालूनच या झाडाच्या शेंगा काढाव्या लागतात. अलीकडे शेतीमध्ये ऐन हंगामाच्या काळात कुशल तथा अकुशल मजूर मिळणे कठीण झाले आहे.
यासाठी वेळेवर आणि कमी मजुरीत योग्य पद्धतीने शेतीची कामे करण्यासाठी सुधारित कृषी अवजारे बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांसाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही सुधारित अवजारे विकसित केली आहेत. हे यंत्र शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. कृषी विद्यापीठात अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्र संशोधन प्रकल्प व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हे यंत्र उपलब्ध आहे.
विद्यापीठाने विकसित केलेल्या मनुष्यचलित फुले शेवगा काढणी यंत्राचे वैशिष्ट्य असे की, या यंत्राद्वारे एका तासात २५० ते २८० शेंगा काढता येतात. या यंत्राने शेवग्याच्या शेंगांना कसलीही इजा होत नाही. देठाची लांबी पाहिजे तितकी ठेवून शेंगांची कापणी करता येते. ज्या शेतकऱ्यांकडे शेवग्याची जास्त प्रमाणात झाडे आहेत, त्या शेतकऱ्यांना हे यंत्र वरदान ठरत आहे.