गृहराज्यमंत्री दीपक केसरकर राजकीय कोंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:04 AM2018-05-01T06:04:37+5:302018-05-01T06:04:42+5:30
केडगाव हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन राजकीय दबावात काम करत असताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही येथे राजकीय कोंडी झाली.
अहमदनगर : केडगाव हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन राजकीय दबावात काम करत असताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचीही येथे राजकीय कोंडी झाली. स्वतंत्र गृहमंत्र्याच्या मुद्द्यावर त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला़
गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका यावर त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.केसरकर यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन जामखेड हत्याकांडाचा आढावा घेतला़ नगर जिल्ह्यात २६ दिवसांत चार राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या़
केसरकर म्हणाले, स्वतंत्र गृहमंत्री हा सेना-भाजपा या दोन्ही पक्षांनी एकत्र बसून घ्यावयाचा निर्णय आहे़ मी मंत्रिमंडळात असताना मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर बोलणे योग्य ठरणार नाही़ मला ठाकरे यांनीच मंत्रिपद दिले आहे़ त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबतही बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले.
शेजारील राज्यातून हत्यारांची तस्करी
शेजारील राज्यातून महाराष्ट्रात गावठी कट्ट्यांची तस्करी होत आहे़ हे कट्टे राज्यात तयार झाले असते तर ते अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले असते़ हत्यारांची तस्करी रोखण्यास मास्टर प्लॅन तयार केला असल्याचे केसरकर म्हणाले़ पाणी मारण्यावरून हत्या
हत्याकांडात अजून राजकीय संबंध पुढे आलेला नाही. दुकानासमोर पाणी मारण्यावरून हत्याकांड झाल्याचे दिसत आहे़ पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.