नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपींची मुक्तता; अहमदनगर जिल्हा न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 07:03 PM2017-11-23T19:03:02+5:302017-11-23T19:03:12+5:30
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या १७ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दहा आरोपींची बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच सुटका झाली आहे.
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे या १७ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दहा आरोपींची बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सुटका केली. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणातील तीन अल्पवयीन आरोपींची यापूर्वीच सुटका झाली आहे.
२८ एप्रिल २०१४ रोजी नितीन राजू आगे याची हत्या झाली होती. नितीन हा गावातील शाळेत बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणातील नितीन आगे याला आरोपींनी शाळेतून मारहाण करत आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन तेथे अमानुष मारहाण केली होती. तसेच डोंगरातील झाडाला त्याला गळफास दिला होता, अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. गावातील आरोपी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले, निलेश गोलेकर, विनोद अभिन्यू गटकळ, भूजंग सुर्यभान गोलेकरसह १३ जणांविरुद्ध हत्या करणे, तसेच अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. राज्यभरात खर्डा येथील हत्या प्रकरण गाजले होते. या प्रकरणी दलित संघटनांना आक्रमक झाल्या होत्या. या खटल्यात सव्वीस साक्षीदार होते. शाळेतील वगार्तून नितीन आगेला आरोपी मारहाण करून घेऊन गेले होते. शाळेचे शिपाई व शिक्षक हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्याचे जबाब ही पोलिसांनी नोंदविले होते. परंतु प्रत्यक्षात न्यायालयात या सर्वांनी योग्य साक्ष न दिल्याने सरकारी पक्षाकडून सर्वांना फितूर म्हणून जाहीर केले होते. गावातील इतर साक्षीदार ही फितूर झाले होते. नितीनचे वडिल राजू, आई यांच्याही या खटल्यात साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवले.