बहुआयामी व्यक्तीमत्वाची अकाली एक्झीट; अनेक गावे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:01 PM2017-10-08T13:01:57+5:302017-10-08T13:04:53+5:30
अहमदनगर : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार राजीव राजळे हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून राजकारणात प्रसिद्ध़ साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि ...
अहमदनगर : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार राजीव राजळे हे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून राजकारणात प्रसिद्ध़ साहित्य, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत चौफेर अभ्यास असलेले असे हे व्यक्तीमत्व़ कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची हातोटी आणि लोकांना आपलेसे करुन घेण्याची कला असलेल्या राजीव राजळे यांची अकाली एक्झीट अहमदनगरकरांना एक मोठा धक्का देऊन गेली़
पुणे विद्यापीठातून आर्किटेक्चर पदवी मिळविल्यानंतर राजीव राजळे यांनी १९९९ मध्ये राजकारणात प्रवेश केला़ प्रारंभी तरुणांचे प्रश्न घेऊन ते व्यवस्थेशी भांडू लागले़ त्यांचे प्रश्न सोडवू लागले़ त्यानंतर काँगे्रसने राजीव राजळे यांना युथ काँगे्रसची जबाबदारी सोपविली़ त्यानंतर त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे करीत तालुक्यावर पकड मिळविली़ त्याचवेळी त्यांनी विविध विषयांचा व्यासंग वाढविला़ कोणत्याही विषयावर ते अभ्यासपूर्ण मत मांडत़ पाथर्डीसारख्या ग्रामीण भागात राजीव राजळे यांनी साहित्यिकांचा मेळा भरविला़ ग्रंथालय चळवळ सुरु करण्यासाठी पुस्तकभेट हा पहिला उपक्रमही राजीव राजळे यांनीच राबविला़ कविसंमेलनापासून संगीत रजनी असे विविध कार्यक्रम आयोजित करुन सांस्कृतिक क्षेत्राचा पाया भक्कम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ ते अनेक विचारवंत, साहित्य यांना त्यांच्या घरी बोलावून विविध विषयावर, नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर, ग्रंथांवर चर्चा करीत़ एक तरुण राजकारणी आणि साहित्यप्रेमी अशी त्यांची ओळख होत असतानाच त्यांनी अर्थशास्त्रावरही पकड निर्माण केली होती़ आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अवकाश तंत्रज्ञान यामध्येही त्यांची विशेष रुची होती़ आंतरराष्ट्रीय घडामोडींची सखोल माहिती ते ठेवायचे़ वाचनाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता़ दलाई लामांपासून ते बांगलादेशच्या बचत गटाच्या प्रवर्तकांपर्यंत तसेच थोर साहित्यकांपासून सामान्यांपर्यंत अतिशय स्नेहपूर्ण सबंध जपणारा युवा नेता अशी त्यांची ओळख होती़ अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाची अकाली एक्झीट नगर जिल्ह्यात सर्वांनाच चटका लावून गेली़ त्यांच्या अकाली निधनामुळे पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये उत्स्फूर्त बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यात आली़ विविध संस्था, व्यापारी, दुकानदार यांनी आपले दैनंदिन कामकाज बंद ठेवून उदोग धंदे बंद ठेवले आहेत.