महा ई सेवा केंद्रांकडून विद्यार्थ्यांची लूट
By Admin | Published: June 25, 2016 12:37 AM2016-06-25T00:37:24+5:302016-06-25T00:39:47+5:30
अण्णा नवथर/नागेश सोनवणे , अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्रांकडून दाखल्यांच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची सर्रास लूट सुरू असल्याचे
अण्णा नवथर/नागेश सोनवणे , अहमदनगर
शहरासह जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्रांकडून दाखल्यांच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची सर्रास लूट सुरू असल्याचे वास्तव ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी केलेल्या स्टिंगदरम्यान उघड झाले. नगर शहरात दाखल्यांसाठी प्रत्येकी ७० तर, जिल्ह्यात दीडशे रुपये आकारले जात आहे. प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचेही स्टींगमधून समोर आले आहे़
शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशाची लगबग सध्या सुरू आहे़ शाळा प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळविण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील महा ईसेवा केंद्रांवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली आहे़ प्रत्येक दाखल्यांसाठी ३२ रुपये ८० पैसे इतके शुल्क आकारावे, असा सेतू समितीचा निर्णय आहे़ मात्र त्यापेक्षा जास्तीचे शुल्क महाईसेवा केंद्र चालक आकारत असल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी आहेत़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत प्रतिनिधींनी’ शहरातील नगर तहसील कार्यालय, नवनागापूर, सावेडी, बुरुडगाव, नालेगाव आदी ठिकाणी भेटी दिल्या़ दाखला काढायचा आहे, किती रुपये लागतील, अशी विचारणा केंद्रातील कर्मचाऱ्यांना केली असता या केंद्रात ७० रुपये लागतील, असे उत्तर मिळाले़ याशिवाय नागापूरसह तालुक्यातील विविध केंद्रांवर एका दाखल्यासाठी दीडशे रुपये लागतील, असे सांगण्यात आले़ जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ ग्रामीण भागात एका दाखल्यासाठी सर्रास दीडशे रुपये शुल्क आकारले जात असून, यावर कळस असाकी पैसे देऊन तत्काळ दाखला मिळत नाही़ नोंदणी केल्यानंतर सहा ते आठ दिवसांनी दाखला मिळतो़ महाईसेवा केंद्रांना दाखल्यांचे दरपत्रक लावण्याचे निर्देश सेतू समितीचे अध्यक्ष दत्तात्रय बोरुडे यांनी गेल्या शुक्रवारीच दिले आहेत़ मात्र त्याचीही अंमलबजावणी केंद्र चालकांकडून झाल्याचे दिसले नाही़ एकाही केंद्रावर दरपत्रक लावलेले नाही़ दरपत्रक न लावता दुपटीने शुल्क आकारले जात असून, यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही़ महाईसेवा केंद्रांची तपासणी करण्याचे तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत़ त्यांच्याकडून केंद्रांची तपासणी होत नसल्याने सेतू चालकांची मनमानी वाढली असल्याचे बोलले जात आहे़
लोकमतच्या प्रतिनिधींनी विद्यार्थी बनून दाखल्यांची मागणी केली़ आमचा प्रतिनिधी व केंद्रांतील कर्मचारी यांच्यातील संभाषण पुढीलप्रमाणे़
प्रतिनिधी- दाखला काढायचा आहे.
कर्मचारी- कोणता दाखला हवा आहे?
प्रतिनिधी- उत्पन्नाचा दाखल काढायचा आहे.
कर्मचारी-अर्जासाठी १० रुपये द्या.
प्रतिनिधी- एकूण किती रुपये लागतील?
कर्मचारी- एका दाखल्यासाठी ७० रुपये लागतील.
दाखले काढण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांशी प्रतिनिधींनी चर्चा केली असता, त्यांनी ७० रुपये दिले असल्याचे सांगितले़ दाखला कोणताही घेतला तरी ७० रुपये द्यावे लागतात़ पैसे दिल्यानंतर नोंदणी करून घेतली जाते़ त्यानंतर सहा दिवसांनी दाखला मिळतो, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले़ शासकीय दराबाबत विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता माहिती नाही, असे अनेकांनी सांगितले़
जिल्हा सेतू समितीचे ई सेवा केंद्रांवर नियंत्रण असते़ महा ई सेवा सुरू करताना त्यासाठी सेतू समितीने नियम निश्चित केले आहेत़ मात्र त्याची अंमलबजावणी महा ई सेवा केंद्रांकडून होताना दिसत नाही़ दरपत्रक लावणे, दाखला मिळण्याची मुदत, दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांना पाठवू नये, यासारखे नियम आहेत़ परंतु, त्याचे पालन होत नाही़