सेनेला सध्या उठताबसता संग्राम जगतापच दिसतो : संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 04:36 PM2019-05-03T16:36:23+5:302019-05-03T17:15:17+5:30
खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़
अहमदनगर : खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संभाषणाचा समावेश असलेल्या व्हायरल क्लिपमागील सत्य उलगडून सांगत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सेनेची पोलखोल केली़ यापूर्वीही आपणावर गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर नाव न घेता केला़
महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट फेकतानाची एक क्लिप सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे़ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या क्लिपवरून सेनेला लक्ष्य केले़ ते म्हणाले, सेनेला सध्या उठबस संग्राम जगतापच दिसतो आहे़ शिवसेनेकडून खोटे गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांवर दहशत व जनतेवर जरब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ मलाही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला़ खोटे गुन्हे कसे दाखल करतात, याचा व्हिडीओ प्रसारित झाला
असून, खोट्या गुन्ह्यांचे ते मार्गदर्शक आहेत असा आरोप जगताप यांनी केला़
आमदार संग्राम जगताप यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी सेनेच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल केले, या सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले़ ते म्हणाले, ठेकेदारावर दबाव आणल्याचा त्यांचा आरोप खोटा असून, उलटपक्षी आमच्या सत्तेच्या काळात आम्ही ठेकेदाराला दंड केला होता़ ठेकेदाराकडे त्यांनी काही मागणी केली असेल ती पूर्ण न झाल्याने हा प्रकार झाला, असा संशयही त्यांनी व्यक्त केला़ बोल्हेगाव रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली होती़ त्याची प्रत महापौर कार्यालयाकडे दिली होती़
रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक पाठपुरावा करत असून, यापूर्वी आंदोलनही केलेले आहे असे सांगून ही मंडळी खोटे गुन्हे दाखल करून जनतेत जरब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत़ त्यामुळे त्यांच्याच काही कार्यकर्त्यांचे संसार उदध्वस्त झाले असून, ते व्यसनाधीन झालेले आहेत़ राजकारणासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असून, आपणही त्याचा बळी ठरलो आहे़ वर्षभरापूर्वी पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून ते स्पष्ट झालेले आहे,असेही जगताप म्हणाले़