पक्षाचा आदेश झुगारुन भाजपाला पाठिंबा, 'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 02:04 PM2018-12-30T14:04:55+5:302018-12-30T15:30:40+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून निलंबित केले आहे.
अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
पवार म्हणाले, नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक ४ किंवा ५ जानेवारी २०१९ होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जाहीर युती दिसून आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला या घटनेचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाठींबा देण्याचा निर्णय माझा व नगरसेवकांचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी काल जाहीर केले होते.
त्यानंतर, आज दस्तुरखुद्द पवारांनी स्पष्टीकरण दिले. महापौर निवडणुकांत स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष झुगारुन निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, प्रदेशाध्यक्षांनी माझ्या झालेल्या चर्चेत त्यांनी असे कुठलेही आदेश पक्षाकडून देण्यात आले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे, जर पक्षाला विचारत न घेता भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय.
महापौर निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपाला पाठींबा दिल्यानंतर सर्वच स्तरातून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अवाक् झाले आहेत. मात्र, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, याबाबत मी माहिती घेतली असून आमच्या राज्य पक्षाध्यक्षांनी असा कुठलाही आदेश दिला नव्हता. तसेच, याप्रकरणी संबंधित नगरसेवकांना नोटीस बजावली असून खुलासा मागविण्यात आला आहे. तर, स्थानिक आमदारांनी भेट घेऊन स्थानिक राजकारणाचं गणित सांगितलं आहे. मात्र, तरीही पक्षाचा आदेश झुगारल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केलंय.