नगर महापालिकेच्या चौकशी अहवालात उघड झाला पथदिव्यांचा घोटाळा; अनियमितता, आर्थिक फसवणुकीचा शेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:13 PM2018-01-12T12:13:04+5:302018-01-12T12:15:31+5:30
अहमदनगर शहराच्या प्रभाग १ आणि २८ मध्ये झालेल्या पथदिव्यांच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या बोगस कामांमुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे.
अहमदनगर : शहराच्या प्रभाग १ आणि २८ मध्ये झालेल्या पथदिव्यांच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. या बोगस कामांमुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. दोन दिवस अभ्यास करून अहवालाचा तपशील जाहीर करू, अशी माहिती महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांनी पत्रकारांना दिली.
महापालिकेतील पथदिव्यांच्या कामात ४० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे २९ डिसेंबरला झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आले होते. त्यानंतर ३० डिसेंबर आणि ४ जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत पथदिव्यांच्या घोटाळ््यावरून सभेत गदारोळ झाला होता. नगरसेवकांच्या मागणीनुसार आणि आयुक्तांच्या आदेशानुसार दोन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. चौकशी समितीचे सदस्य तथा सहायक नगररचना संचालक संतोष धोंगडे आणि अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी आठ दिवस चौकशी करून बुधवारी रात्री चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर केला. सदरचा अहवाल गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आयुक्तांनी उघडला. यावेळी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक अनिल शिंदे, मुदस्सर शेख, दीप चव्हाण, सहायक आयुक्त विक्रम दराडे, आस्थापना प्रमुख लहारे यांची उपस्थिती होती. बंद पाकिटातून गोपनीय अहवाल उघडल्यानंतर आयुक्तांनी या अहवालाचे निष्कर्ष पत्रकारांना सांगितले.
अहवालात १६ पानी निष्कर्ष आहे. या अहवालाबाबत आयुक्त मंगळे म्हणाले, समितीने दिलेल्या अहवालावर दोन दिवस अभ्यास केला जाईल. अहवाल गोपनीय असल्याने तो सविस्तरपणे सांगता येणार नाही. प्रभाग क्रमांक १ आणि २८ च्या संबंधित नगरसेवकांनी पथदिवे बसविण्याबाबत कोणतीही शिफारस केली नसल्याचे आढळून आले आहे. ज्या कामांमध्ये घोटाळा झाला आहे, त्या पथदिव्यांच्या कामांची संचिका (फाईल) उपलब्ध नसल्याने कोणत्या कामांत घोटाळा झाला त्याचा बोध होत नाही. चौकशीला ठेकेदार उपस्थित राहिला नाही. तरीही सर्व चौकशीअंती झालेला घोटाळा गंभीर आहे. कामात अनियमितता असून महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट होतो. अहवालाचा अभ्यास करून यामध्ये दोषी असणा-यांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी
सांगितले.
चौकशीमध्ये संबंधित सदस्यांचे, कर्मचारी, अधिका-यांचे जबाब घेतले आहेत. कामाबाबतचे फोटोही अहवालात दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि दोष सिद्ध होईपर्यंत अहवाल कोणालाही देता
येत नाही. गोपनीय अहवाल उघड करणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट
केले.
३८ ते ४० लाखांची १९ कामे
घोटाळा झाला ती कामे रेल्वे स्टेशन आणि भिस्तबाग रोड पसिरातील आहेत. घोटाळा झालेल्या कामांची संख्या १९ आहे. प्रत्येक काम किमान पावणे दोन ते दोन लाख रुपये खर्चाचे आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा घोटाळा ३८ लाख रुपयांचा असल्याचे दिसते. या अहवालात ज्यांचे जाब-जबाब घेतले ते सर्वच दोषी असतील, असे नाही. दरम्यान सदरचा अहवाल स्वीकारयचा की नाकारायचा याचा संपूर्ण अधिकार ज्यांनी चौकशी समिती प्राधिकृत केली, त्या अधिका-यांचा म्हणजे आयुक्तांचा आहे. दरम्यान पोलिसांनी पाठविलेली प्रश्नावलीचे उत्तर शहर अभियंत्यांनी सायंकाळनंतर पोलिसांना दिले. तसेच मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांना स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करण्याचे सांगितले आहे. अहवालावर संबंधित विभागाच्या अधिकायांकडून टिप्पणीही घेऊनच पुढील कारवाई होणार आहे. निलंबित अधिका-यांनाही ठेकेदारावर गुन्हा दाखल करता येईल, असे आयुक्त म्हणाले.