खासदार सुजय विखे 'किंगमेकर'च्या भूमिकेत; 'टार्गेट रोहित पवार'साठी यंत्रणा कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 01:00 PM2019-10-14T13:00:08+5:302019-10-14T14:29:09+5:30
मुख्यमंत्री आणि सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मर्जी देखील सुजय विखे यांनी संपादित केल्याचे दिसत आहे.
अहमदनगर : नगर जिल्ह्यात भाजपमध्ये सुजय विखे हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. बहुतांश मतदारसंघात त्यांची यंत्रणा भाजपच्या उमेदवारांच्या मदतीला उतरली आहे. मुख्यमंत्री आणि सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मर्जी देखील सुजय विखे यांनी संपादित केल्याचे दिसत आहे.
सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना स्वीकारले जाईल का हा प्रश्न होता. पण मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत तो संभ्रम विखे यांनी दूर केला. सध्या विधानसभेच्या रणधुमाळीत सर्वच तालुक्यात खासदार विखे यांच्या सभांना मागणी आहे. ब-याचदा ते आक्रमक बोलतात. त्यातून वादही उद्भवतात. पण त्यांचे बोलणे मतदारांना अपील होताना दिसत आहे. यावेळी रोहित पवार यांच्या उमेदवारीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ चर्चेत आला आहे. हा असा मतदारसंघ आहे जेथे विखे यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे सुजय यांनी आपली सर्व यंत्रणा राम शिंदे यांच्या मदतीला उतरवली आहे. आपली स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणे त्यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. श्रीगोंदा मतदार संघात राजेंद्र नागवडे यांना भाजपमध्ये आणण्यात सुजय विखे यांची भूमिका महत्त्वाची आहे. नागवडे भाजपमध्ये आल्याने बबनराव पाचपुते यांना मदत होणार आहे. गतवेळी शरद पवार यांनी नागवडे, राहुल जगतात यांना एकत्र आणले होते. यावेळी विखे यांनी पाचपुते-नागवडे यांना एकत्र केले. पारनेरमध्येही सुजित झावरे यांना विखे यांनी जवळ केले आहे. विखे यांनी ताकद लावली नाहीतर विजय औटी अडचणीत आहेत, अशी परिस्थिती आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही विखे हे पूर्ण ताकदीनिशी मोनिका राजळे यांच्यासाठी बांधणी करीत आहेत. राहुरी मतदारसंघातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. दक्षिणेप्रमाणे उत्तरेतही श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, संगमनेर या मतदारसंघात विखे यांची भूमिका सेना-भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची बनली आहे. श्रीरामपूरमध्ये तर कांबळे यांची सर्व भिस्त राधाकृष्ण विखे यांच्यावर आहे. विखे यांनी अंग काढले तर येथे सेनेची फजिती उडेल. संगमनेर मतदारसंघातही विखे हेच लक्ष देत आहेत. अन्यथा युती कमजोर दिसते.
नगर जिल्ह्यात १२-० अशी परिस्थिती निर्माण करू, असा नारा विखे यांनी दिला आहे. तशी शक्यता दिसत नाही. अनेक ठिकाणी काँगे्रस आघाडीने आव्हान उभे केले आहे. चुरस आहे. मात्र सेना-भाजप युतीला विखे यांचा मोठा आधार मिळाल्याचे दिसत आहे. विखे नसते तर युती आहे त्यापेक्षाही अडचणीत असती. त्यामुळे विखे हे युतीचे तारणहार ठरले आहेत. विखे यांचा प्रचाराचा सर्व रोख हा राष्ट्रवादीवर आहे.
सुजय यांच्या भाषणाला उद्धव ठाकरे यांनी नगरमध्ये दाद दिली. ते युतीच्या नेत्यांनाही चिमटे काढणे सोडत नाहीत. दुस-या फळीला संधी द्या, लोकांशी चांगले बोला अशा सूचना त्यांनी व्यासपीठावर नेत्यांना केली. गिरीश महाजन हे
भाजपात संकटमोचक म्हणून ओळखले जातात. सुजय विखे हे सध्या जिल्ह्यात तीच भूमिका वठवताना दिसत आहेत़