श्रीगोंदा तालुक्यात तमाशा कलावंतांना मारहाण : महिलांचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:01 AM2019-04-26T10:01:42+5:302019-04-26T14:36:03+5:30
टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या तमाशात गावातीलच रिपांईच्या २०-२५ कार्यकर्त्यांनी हिरामण बडे- शिवकन्या बडे तमाशा मंडळे यांच्या तमाशातील कलावंताना जबर मारहाण केली.
श्रीगोंदा : टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्ताने आयोजित केलेल्या तमाशात गावातीलच २०-२५ कार्यकर्त्यांनी हिरामण बडे- शिवकन्या बडे तमाशा मंडळे यांच्या तमाशातील कलावंताना जबर मारहाण केली. यामध्ये काही महिला कलावंताचा विनयभंगही करण्यात आला. मारहाणीमध्ये दहा ते बारा तमाशा कलावंत जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार ग्रामस्थांनी यात्रेनिमित्ताने शिवकन्या बडे यांचा तमाशा आयोजित केला होता. तमाशा सुरू होण्यापूर्वी पाचते सहा कार्यकर्ते तमाशा कलावंताच्या तंबूत घुसले. त्यांनी विनाकारण तमाशा कलावंताशी हुज्जत घातली. त्यानंतर शिवकन्या बडे त्यांच्या पाया पडल्या. आम्ही तुमच्या गावात आम्ही पोट भरण्यासाठी आलो आहोत. आम्हाला त्रास देऊ नका असेही त्या म्हणाल्या. हल्लेखोरातील एका बडे यांना धमकी दिली. तुम्हाला आमचा झटका दाखवितो असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर अर्ध्या तासाने २०-२५ तरुणाचे टोळके तमाशा तंबूत घुसले. तमाशातील महिला व पुरुष कलावंताना बेदम मारहाण केली. काही कलावंत मुलींचा विनयभंगही त्यांनी केला. त्यांचे कपडे फाडले तसेच तंबूचे नुकसान केले. जखमींना नगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले .
पोलीस आले अन मोकळ््या हाताने परतले
या हल्ल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस गावात आले. मात्र कसलीही चौकशी न करता आल्या पावली ते निघून गेले. तमाशा कलावंतावर झालेल्या हल्ल्याची कोणतीही दखल पोलीसांनी घेतली नाही. पोलिसांनाही या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहिले नाही.
तक्रार केली तरच गुन्हा दाखल करू
तमाशा कलावंतांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करू. त्यानंतर आरोपींना अटक करता येईल, असे श्रीगोंदा पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.