शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक
By सुदाम देशमुख | Published: May 7, 2024 08:57 AM2024-05-07T08:57:42+5:302024-05-07T08:58:10+5:30
अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे नुकसान झाले आहे.
राजूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमारास चितळवेढे घाटात घडली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील प्रचाराचा दौरा आटपून उत्कर्षा रूपवते संगमनेर कडे येत होत्या. राजूर जवळील चितळवेढे घाटातून येत असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वंचित बहुजन आघाडीचे समर्थकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या या घटनेचा निषेध त्यांनी निषेध व्यक्त केला. रूपवते यांनी राजूर पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे यांनी सांगितले.