काटेपूर्णा धरणात उरला १९ टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:32 AM2017-07-22T01:32:48+5:302017-07-22T01:32:48+5:30
अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात शुक्रवारपर्यंत १९.०९ टक्के जलसाठा उरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी सार्वत्रिक दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन एक महिना २१ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात अद्याप वाढ झाली नाही. गत २० दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने गत १९ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार हजेरी लावली; मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही.
त्यामुळे वान धरण वगळता जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे.
त्यामध्ये अकोला शहरासह ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा आणि मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात २१ जुलै रोजी १९.०९ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस बरसण्याची प्रतीक्षा केली जात आहे.