अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या नावावर २१ लाखांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:43 PM2017-12-19T16:43:18+5:302017-12-19T16:49:17+5:30
अकोट : अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे.
अकोट : अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. परंतु या शौचालयांची परिस्थिती ‘जैसे थे’ च आहे.
अकोट नगर परिषदेने विविध योजनेंतर्गत लाभार्थींना अनुदान देऊन घरगुती शौचालये बांधून घेतली आहेत. त्यासाठी लाभार्थींजवळून पुरावे घेत टप्प्या-टप्प्याने निधी वितरित केला आहे. त्यामुळे घराघरांत शौचालये उभारल्याने अकोट नगर परिषदेला सरकारने हगणदरीमुक्त शहर म्हणून घोषित केले आहे. मात्र, दुसरीकडे याच्या विपरीत विविध प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची फार दुरवस्था झाली आहे. आधीच जीर्ण झालेल्या शौचालयांच्या दुरुस्ती व रंगरंगोटीकरिता १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून २१ लाख ६० हजार रुपये खर्च दाखवित कंत्राटदारांकडून नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे करून घेतली आहेत. या कामांमध्ये शिवाजी मार्केटमधील शौचालय, जुना उमरा रस्त्यावरील शौचालय, दखनी फैल येथील शौचालय, शासकीय धान्य गोडावूनजवळील शौचालय, गवळीपुरा येथील शौचालय, डोहरपुरा येथील शौचालय, नगर परिषद मराठी व उर्दू शाळेतील सार्वजनिक शौचालय आदी शौचालयांंचा समावेश आहे. या शौचालयांची पाहणी केली असता नगर परिषदेच्या पैशातून कंत्राटदाराने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यापूर्वी असलेली शौचालयांची स्थिती ‘जैसे थे’च असल्याचे या परिसरातील अनेक नागरिकांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
कोट...
शौचालयाची रंगरंगोटी व दुरुस्तीच्या नावावर २१ लाख ६० हजार रुपयांची देयके कंत्राटदाराने पालिकेकडून काढली आहेत. परंतु खर्चाप्रमाणे काम झाले नाही. दुरवस्थेच्या पुराव्यानिशी तक्रार जिल्हाधिकारी व संबंधितांकडे केली आहे. पालिकेच्या बांधकाम अधिकाºयांनी ही कामे सुरू असतानाच पाहणी केली असती तर शौचालयांची परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली नसती.
- महादेवराव सातपुते
सामाजिक कार्यकर्ता, अकोट
फोटो