अकोला शहरात अवघ्या २४ तासांत दोन खून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:43 AM2017-12-15T01:43:26+5:302017-12-15T01:53:11+5:30
अकोला : शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून अवघ्या २४ तासात दोन गटात हाणामारीच्या घटनेसह दोन खून झाले आहेत. गुरुवारी रात्री तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणार्या राउंड रोडवर युवकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रशांत सुखलाल निंगोट असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून अवघ्या २४ तासात दोन गटात हाणामारीच्या घटनेसह दोन खून झाले आहेत. गुरुवारी रात्री तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणार्या राउंड रोडवर युवकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रशांत सुखलाल निंगोट असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधव नगर येथे राहत असलेले प्रशांत सुखलाल निंगोट (३७) यांना काही युवकांनी घरुन बाहेर बोलाविले व कौलखेडकडे जाणार्या राउंड रोडवरील जुन्या पिल कॉलनीसमोर प्रशांत यांच्यावर चाकूने वार केले. प्रशांतच्या अंगावर तब्बल ७ ते ८ ठिकाणी चाकूने वार करण्यात आल्याने तो रक्ताच्या थारोळय़ात पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोर पसार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशांतला उपचारासाठी सर्वोपचारमध्ये हलविले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली.
याप्रकरणात खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरविली असून, दोन संशयितांची नावे समोर आली आहेत. मृतक प्रशांत हा भिमकायदा या संघटनेचा अध्यक्ष होता.पूर्व वैमनस्यातून प्रशांतची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया खदान पोलीस स्टेशनमध्ये सुरु होती. आरोपींचा शोध घेत होते. रात्री प्रशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना!
- प्रशांत निंगोट यांची निर्घृण हत्या केल्यानंतर पसार झालेल्या आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
- दोन संशयित आरोपींची नावे समोर आली असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
- प्रशांत हा कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा तंत्रज्ञ होता. तसेच शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजनही तो करत असे.
-------------------
शिवसेना वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून युवकाची हत्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १४ जणांना अटक केली.
शहरातील शिवसेना वसाहतमध्ये राहणार्या तुषार नागलकर याच्या घरी बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत धुंद असलेले शैलेश अढाऊ, अश्विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान यांच्यासह आणखी काही युवक गेले. याठिकाणी त्यांनी तुषार नागलकर याला घराबाहेर बोलावून अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढत गेल्याने, नागलकर याच्या गटाने विरोधी गटावर सशस्त्र हल्ला चढविला. शैलेश अढाऊ याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्यावर तो जागीच रक्ताच्या थारोळय़ात कोसळला. हे पाहताच, या गटातील युवक पळायला लागले; परंतु नागलकर गटाने या युवकांवर जोरदार सशस्त्र हल्ला चढविला. यात अश्विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान हे गंभीर जखमी झाले. दुसर्या गटातील तुषार नागलकर हासुद्धा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी भेट दिली. दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नागलकर गटाविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला तर दुसर्या गटांतील युवकांविरुद्ध ३0७, ३२४, ५0४, १४३(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी दुपारपर्यंत १४ जणांना अटक केली आहे.
या वादातून हल्ला
शिवसेना वसाहतीजवळच अग्रवाल नामक इसमाचा प्लॉट आहे. या प्लॉटवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक अतिक्रमण करायचे. नंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी अग्रवालसोबत सेटलमेंट करायचे. नागलकर गटाने या प्लॉटवर काही लाकडी साहित्य ठेवलेले होते. याचा जाब विचारण्यासाठी शैलेश अढाऊ, अश्विन नवले आणि काही युवक तुषार नागलकरच्या घरी गेले होते. याठिकाणी त्यांनी नागलकरला अश्लील शिवीगाळ केली आणि त्याच्या घरातील दरवाजावर लाथासुद्धा मारल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यातूनच नागलकर गटातून त्याच्यावर सशस्त्र हल्ला झाला.
दोन्ही गटातील आरोपींना अटक
- राहुल खडसान याच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सचिन नागलकर, अक्षय नागलकर, तुषार नागलकर, शुभम नागलकर, अमर भगत यांच्यासह आणखी तीन जणांविरूद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ३0२ आणि आर्म अँक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
- दुसर्या गटातर्फे तुषार दिलीप नागलकर याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सागर पुर्णये, अश्विन नवले, शैलेश अढाऊ, राहुल खडसान, मंगेश गंगाराम टापरे, आशिष शिवकुमार वानखडे, किशोर सुधाकर वानखडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३0७, ३२४, २९४, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल करून, आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
अग्रवालच्या प्लॉटवरील बांबू जाळल्यावरून वाद
राहुल खडसान याच्या तक्रारीनुसार, बुधवारी उशिरा रात्री त्याचे मित्र शैलेश अढाऊ, सागर पुर्णये, अश्विन नवले, राहुल टाले, सचिन चांभारे यांच्यासह अन्नपूर्णा माता मंदिराजवळ पार्टी करण्यासाठी गेलो होतो. तेथून परतल्यानंतर सर्व युवक मारोती नगरातील नागलकर यांच्या घराजवळ पोहोचले. यठिकाणी सचिन नागलकर, शुभम नागलकर यांनी, सागर पुर्णये याच्याकडे पाहून, अग्रवालच्या प्लॉटवरील बांबू का जाळले, असे म्हणत वाद घातल्याचे म्हटले आहे.