अकोला : शेतकर्याच्या खून प्रकरणात दोघांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:53 AM2017-12-20T01:53:35+5:302017-12-20T01:53:49+5:30
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथील ५६ वर्षीय लालसिंग भागा राठोड या शेतकर्याच्या खून प्रकरणात पोलिसांकडून मृताची पत्नी व मुलीनंतर इतर दोघांचीही चौकशी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथील ५६ वर्षीय लालसिंग भागा राठोड या शेतकर्याच्या खून प्रकरणात पोलिसांकडून मृताची पत्नी व मुलीनंतर इतर दोघांचीही चौकशी करण्यात येत आहे.
राजनखेड येथील लालसिंग राठोड हे ६ डिसेंबर रोजी सकाळी स्वत:च्या शेतात पत्नी उषा राठोड व मुलगी मनिषा ऊर्फ मोनू हिच्यासोबत गेले होते. दिवसभराचे काम आटोपून त्यांनी पत्नी आणि मुलीला सायंकाळी शेतातून घरी परत पाठविले. अंधार पडल्यावरही ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने शेजार्यांना माहिती दिली. त्यांनी त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर शेतात जाऊन त्यांचा शोध घेतला. शेजार्यांनी त्यांचा मित्र आगीखेड येथील रामा नाभरे व शेलगावचे वसंत मदने (खाटीक) यांच्याकडे माहिती घेतली. त्याच दिवशी त्यांचा मुलगा किरण लालसिंग राठोड यानेही शेजार्यांसोबत रात्री दहा वाजताच्या सुमारास शेतात वडिलांचा शोध घेतला. तेव्हा ते शेतामध्ये गंभीर जखमी अवस्थेत रात्री मिळून आले. त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर घाव होते.
गावाच्या सरपंचांनी लगेच यासंदर्भात बाश्रीटाकळी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रात्री सव्वा दोन वाजता घटनास्थळ गाठले. तक्रार दाखल झाल्यानंतर बाश्रीटाकळीचे पोलीस निरीक्षक परिविक्षाधिन अधिकारी राहुल धस व सहायक पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्याकडून या प्रकरणात मृताची पत्नी उषा आणि मुलगी मनिषा ऊर्फ मोनु यांची कसून चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडून स्थानिक गुन्हे शाखेतर्फे मृत राठोडचे मित्र आगीखेड येथील रामा नाभरे व शेलगावचे वसंत मदने (खाटीक) यांची चौकशी करण्यात येत आहे. दोन ते तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे.