अकोला महापालिकेत विरोधकांचा गदारोळ; डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावरून सभागृहात तोडफोड, नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:01 PM2017-12-16T15:01:40+5:302017-12-16T15:07:20+5:30
अकोला: डंम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी धुडकावून लावताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात नारेबाजी व तोडफोड केली. या गदारोळातच महापौर विजय अग्रवाल यांनी विषय पत्रिकेवरील सर्व पाचही विषयांना अवघ्या १८ मिनीटांत मंजूरी दिली.
अकोला: भूमिगत गटार योजनेतील ‘एसटीपी’च्या जागेसाठी पाठपुरावा करणाºया सत्ताधारी भाजपाकडून नायगाव परिसरातील डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. शिवसेनेच्या मदतीला विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाचे नगरसेवक धावून आले. डंम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी धुडकावून लावताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात नारेबाजी व तोडफोड केली. या गदारोळातच महापौर विजय अग्रवाल यांनी विषय पत्रिकेवरील सर्व पाचही विषयांना अवघ्या १८ मिनीटांत मंजूरी दिली.
महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. त्यापृष्ठभूमिवर महापौर विजय अग्रवाल यांनी पाणीटंचाईच्या काळात निर्माण होणाºया समस्येवर मात करण्यासाठी जलप्रदाय विभागाला आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. जलप्रदाय विभागाने हद्दवाढ झालेल्या नवीन प्रभागांसह संपूर्ण शहरासाठी संभाव्य उपाययोजना करण्यासाठी १४ कोटी १५ लक्ष रूपयांचा प्रस्ताव तयार केला होता. महापालिकेच्या मुख्य सभागृहात शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या महत्वाच्या विषयावर चर्चा होईल,अशी अपेक्षा होती. सभेला सुरुवात होताच शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी १६ नोव्हेंबर व २३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सभेच्या इतिवृत्ताचा मुद्दा उपस्थित केला. मागील दोन्ही सभांमध्ये ज्या विषयांवर निर्णय घेण्यात आले, त्यासंदर्भात सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली. ही मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी धुडकावून लावत मागील सभेचे इतिवृत्त मंजूर केले. महापौरांच्या भूमिकेवर आक्षेप घेत राजेश मिश्रा यांनी नायगाव परिसरातील डंम्पिंग ग्राऊंडचा विषय उपस्थित केला. डंम्पिंग ग्राऊंडमुळे नायगाव, शिलोडा, अकोटफैल आदि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून कचºयाची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचे शिवसेनेचे मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे आधी डंम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर चर्चा करा त्यानंतर इतर विषयांवर चर्चा करण्याची मागणी राजेश मिश्रा यांनी लावून धरली. महापौर अग्रवाल यांनी विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा करण्याची सूचना करताच शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंचे नगरसेवक धावून आले.