अकोला : तीन महिने उलटूनही स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांचे नामांकन नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:15 PM2017-12-18T23:15:47+5:302017-12-18T23:18:35+5:30
अकोला : केंद्र शासनाने घोषित केल्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ साठी नामांकन सादर करण्याच्या सूचना शासनाने ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या; परंतु तीन महिने उलटूनही राज्यातील शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्र शासनाने घोषित केल्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ साठी नामांकन सादर करण्याच्या सूचना शासनाने ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या; परंतु तीन महिने उलटूनही राज्यातील शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाही. स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत शाळा अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्यामुळे शासनाने नामांकन पाठविण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे.
केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ विद्यालय पुरस्कार योजना सुरू केली. या पुरस्कारासाठी सर्वच राज्यांमधील शासकीय, खासगी शाळांकडून नामांकन मागविण्यात येतात आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था, उत्तम इमारत, नियमित स्वच्छता या निकषांच्या आधारावर शाळांची जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रारंभी जिल्हा स्तरावरील निवड झालेल्या शाळेला राज्य स्तरावर संधी दिली जाते. राज्य स्तरावरील शाळांमधून काही शाळांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात येते. शासनाने राज्यातील शाळांना ७ सप्टेंबर रोजी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तीन महिने उलटून गेल्यानंतरही शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाहीत. या शाळांना पुरस्कारासाठी नामांकन पाठवता यावे. या दृष्टिकोनातून शासनाने आता ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत मुदत वाढविली आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ संदर्भात शाळांसाठी नामनिर्देशन करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून एमएचआरडीच्या संकेतस्थळावर आणि स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाइल अँपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्वच्छ पुरस्कार योजनेमध्ये शाळांचा सहभाग वाढावा आणि अधिकाधिक शाळांनी पुरस्कार योजनेसाठी नामांकन भरावे, यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. त्यामुळे शाळांनी तातडीने नामांकन सादर करावे.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी