आंदोलनकर्त्यां शेतकर्यांच्या सर्व मागण्या मान्य; सिन्हांचे आंदोलन ठरले ‘यशवंत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:16 AM2017-12-07T02:16:26+5:302017-12-07T02:26:17+5:30
‘कासोधा’ परिषदेनंतर ४ डिसेंबरपासून पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील शेतकर्यांच्या आंदोलनाला तिसर्या दिवशी यश मिळाले. थेट मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवित मान्यता दिल्यामुळे सिन्हांनी पुकारलेले आंदोलन ‘यशवंत’ ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘कासोधा’ परिषदेनंतर ४ डिसेंबरपासून पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील शेतकर्यांच्या आंदोलनाला तिसर्या दिवशी यश मिळाले. थेट मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवित मान्यता दिल्यामुळे सिन्हांनी पुकारलेले आंदोलन ‘यशवंत’ ठरले. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात प्रथमच घडलेल्या या आंदोनलामध्ये बुधवारी सकाळी राज्य व देशपा तळीवरील नेत्यांसह गर्दी वाढत गेली. अन् शासन, प्रशासनावर दबाव वाढला. मु ख्यमंत्र्यांनी सकाळी ११ वाजता सिन्हा यांच्या समवेत भ्रमणध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर वेगवान घडामोडी होत सायंकाळच्या सुमारास मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
सत्तेत असताना पवारांनी का नाही सोडविले शेतकर्यांचे प्रश्न - बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषी मंत्रीपद भुषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेत्यांनी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याची हिंमत का दाखविली नाही, आ ताच त्यांना शेतकर्यांचा एवढा पुळका कशासाठी येत आहे, अशी बोचरी टीका प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केली.आजवरच्या कोणत्याही सरकारने शेतकर्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकरी नेहमीच नागविल्या गेला आहे; परंतु सत्ताधार्यांना त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. संकटांनी पिचलेला शेतकरी आत्मह त्या करीत असतानाही सरकार शांत आहे. शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता स्वत: शेतकर्यांनीच पुढे यायला हवे. या सरकारकडून कोणतीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही. यापुढे कोणत्याही शेतकर्याने हिंमत न हारता परिस्थितीचा सामना करायला हवा. कोणाच्याही मनात आत्महत्येचा विचार डोकावत असेल, तर त्या शेतकर्याने मला केवळ एक मिसकॉल द्यावा, त्यांच्या हक्कासाठी मी प्राणाची बाजी लावण्यासही तयार आहे, असे ते म्हणाले.
अकोल्याच्या मातीत जादू - आ. शंकरअण्णा धोंडगे
अकोल्याच्या मातीत जादू आहे. १९८६ मध्ये अकोल्यात सुरू झालेले कापूस आंदोलन राज्यभर पेटले होते. आतासुद्धा अकोल्याच्या मातीतून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पेटली असून, ती राज्य, देशपातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आंदोलनाला दिशा मिळेल. असे शेतकरी नेते माजी आ. शंकरअण्णा धोंडगे म्हणाले.
भाजपकडून शेतकर्यांची उपेक्षा - प्रीती मेनन
आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना, केंद्र शासनाने नाफेडच्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांचा छळ चालविला आहे. तूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप करीत मेनन म्हणाल्या की, देशाचे अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा हे भाजपचे नेते असूनही, भाजपचे पालकमंत्री, खासदार, आमदार त्यांच्या भेटीला आले नाहीत, याचा निषेध करायला हवा.
शेतकर्यांसाठी संसदेचे विशेष सत्र बोलवा- खा. दिनेश त्रिवेदी
तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना, शे तकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या घामाचा पैसा मिळालाच पाहिजे. शेतमालाला आधारभूत भाव मिळावा, यासाठी कायदा आहे; परंतु आधारभूत भाव मिळत नाही. भाजपने शेतकर्यांना आधारभूत भाव देण्याचे वचन दिले होते. त्याचा विसर भाज पला पडला आहे. शेतकर्यांच्या समस्यांचा डोंगर वाढत आहे. शेतकर्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी खा. दिनेश त्रिवेदी यांनी केली
कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी - खा. प्रतापराव जाधव
सेनेचे बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी, आम्ही भाजपसोबत सत्तेत असलो तरी शेतकर्यांच्या पाठीशी आहोत. नोटाबंदीची झळ सर्वसामान्य जनता, शेतकर्यांना पोहोचली. नोटबंदीमुळे तुरीचे दर घसरले. कर्जमाफीबाबत शेतकरी संभ्रमात आहे त. आता कर्जमाफी नको, तर संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकर्यांनो झेंडा कोणाचाही घ्या, दांडा आपला ठेवा - रविकांत तुपकर
साडेतीन वर्षे आम्ही भाजपसोबत सत्तेत होतो. हे शासन बोलते वेगळं आणि करतंय वेगळंच. सरसकट कर्जमाफी करीत असल्याचा देखावा निर्माण करून भाजपने त्यात तत्त्वत: कर्जमाफी केली. निकष लावले आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी रात्र-रात्र जागविले. त्यामुळेच आम्ही सत्तेबाहेर पडलो. आता शेतकर्यांनो, झेंडा कोणाचाबी घ्या; परंतु दांडा मात्र आपलाच ठेवा, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मार्गदर्शन केले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोबाइलवरून मार्गदर्शन
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचने पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या प्रीती मेनन, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना पोलीस मुख्यालयी धाडून आंदोलनास पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या सर्व नेत्यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, खा. दिनेश त्रिवेदी यांच्या मोबाइलवर संपर्क साधून ममता बॅनर्जी यांनी शेतकर्यांसोबत संवाद साधला आणि शेतकरी आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहेत. आम्ही शेतकर्यांसोबत आहोत. भाजप सरकार शेतकरी विरोधी असून, या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.