मंगळसूत्र विकून शौचालय बांधणारी संगिता बनली स्वच्छता अभियानाची ब्रँड अँम्बॅसिडर!
By admin | Published: November 8, 2014 11:32 PM2014-11-08T23:32:26+5:302014-11-09T19:00:16+5:30
वाशिम जिल्हा प्रशासन संगीता आव्हाळे यांच्या माध्यमातून जागृती मोहीम हाती घेणार.
वाशिम: शौचालय बांधण्याकरिता सौभाग्यलेणे विकण्याचे धाडस दाखविणार्या, जिल्ह्यातील सायखेडा येथील संगिता आव्हाळे यांची, जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी संगीता आव्हाळे यांच्या घरी जाऊन, त्यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार केला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
संगीता आव्हाळे यांनी त्यांच्या कृतीतून सर्वांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. शौचालय नसल्यामुळे महिलांची खूप कुचंबना होते; मात्र त्याकडे कुटुंबीय दुर्लक्ष करतात. संगीता आव्हाळे यांनी या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कृतीमुळे शौचालयाचे महत्व समजून घेऊन, इतर लोकही शौचालय बांधतील, अशी जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे.
जिल्हा प्रशासन संगीता आव्हाळे यांच्या माध्यमातून शौचालयांसंदर्भात जागृती मोहीम हाती घेणार आहे. या मोहिमेंतर्गत संगीता आव्हाळे जिल्हावासीयांना शौचालयाचे महत्व पटवून देणार आहेत.