उरळ ठाण्यातील लाचखोर पोलीस गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 02:32 AM2016-03-10T02:32:24+5:302016-03-10T02:32:24+5:30
लाचखोर एएसआय शिंदे फरार, पोलीस कर्मचा-यासह होमगार्ड गजाआड.
अकोला: तेल्हारा ते निंबा फाटा दरम्यान प्रवासी वाहतूक करणार्या काळीपिवळी टॅक्सी चालकाकडून ५00 रुपयांची लाच घेणार्या लाचखोर पोलीस कर्मचार्यास व त्याचा साथीदार असलेल्या होमगार्डला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी अटक केली. या दोघांचा वरिष्ठ असलेला लाचखोर एएसआय नरेंद्र विश्वनाथ शिंदे (५७) हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रवासी वाहतूक करणार्या टॅक्सी चालकावर कारवाई टाळण्यासाठी तसेच प्रवासी वाहतुकीचा अघोषित परवाना म्हणून हप्ता वसूल करणार्या एएसआय नरेंद्र शिंदे, पोलीस कर्मचारी हुसेन खान मुमताज खान व होमगार्ड किसन डिगांबर मेटांगे या तिघांनी ५00 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबधित चालकाने या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी निंबा फाटा येथे सापळा रचला. पोलीस कर्मचारी हुसेन खान मुमताज खान याने टॅक्सी चालकाकडून ५00 रुपयांची लाच घेताच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यानंतर ही रक्कम बाळगणारा होमगार्ड किसन मेटांगे यालाही पोलिसांनी अटक केली; मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा लक्षात येताच एएसआय नरेंद्र शिंदे हा घटनास्थळावरून फरार झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणातील हुसेन खान मुमताज खान व होमगार्ड किसन मेटांगे या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या तिन्ही आरोपींविरुद्घ उरळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे