बीटक्वाइनचा सट्टाबाजार तेजीत!
By admin | Published: March 16, 2017 02:36 AM2017-03-16T02:36:43+5:302017-03-16T02:36:43+5:30
युवा वर्गात मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळला जात आहे.
संजय खांडेकर
अकोला, दि. १५- वरली मटका, ऑनलाइन लॉटरीनंतर आता ऑनलाइन खरेदी-विक्री होत असलेल्या बिटक्वाइनची धूम तरुण आणि सुशिक्षित वर्गात पाहावयास मिळत आहे. बीटक्वाइनच्या दरात होत असलेल्या चढ-उतारावर युवा वर्गात मोठय़ा प्रमाणात सट्टाबाजार खेळला जात आहे.
जगातील मोठया राष्ट्रांमधून बीटक्वॉइनचा सट्टाबाजार भारतातही आला आहे. हा सट्टाबाजार आता देशातील मेट्रो सिटीत नवीन नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि अकोल्यातही हा बाजार येऊन ठेपला आहे. बीटक्वॉइनवर दररोज कोट्यवधीची उलाढाल होत असून अकोल्यातील शेकडो युवक हा ऑनलाइनचा सट्टा बाजार खेळत असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळत आहे. कधीकाळी पन्नास हजार रुपयांच्या घरात असलेल्या एका बीटक्वाइनची किंमत आज ८८ ते ८९ हजार रुपयांपर्यंंंंत झाली आहे. दररोज बीटक्वॉइनचा बाजार उघडतो. चढ-उतारावर ऑनलाइन गुंतवणूक केली जाते. २ ते ३ टक्के शुल्क त्यावर लागते. बीटक्वॉइन तेजीत आले की, शेअर बाजाराप्रमाणे क्वॉइन विकल्या जातात.
काय आहे बीटक्वॉइन?
युनायटेड स्टेटमध्ये डिजिटल चलन, अभासी मुद्रा म्हणून बीटक्वॉइन जगाच्या समोर आले. नाणी किंवा नोटाप्रमाणे कुणालाही ते पर्समध्ये ते ठेवता येत नाही. ऑनलाइन-इलेक्ट्रॉनिक खरेदी व हस्तांतरण मात्र करता येते. जगातील मित्र आणि व्यापारी वर्गात बीटक्वॉइनच्या चलनास पसंती मिळत असल्याने त्याभोवती सट्टाबाजार सुरू झाला. जगभरात सुरू झालेल्या या सट्टाबाजारात आता गावाखेड्यातील युवकांनी उड्या घेतल्या आहेत. बीटक्वॉइनच्या सट्टाबाजारात अनेकांना मोठा लाभ झाल्याने बीटक्वॉइनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. बीटक्वॉइनचा चढ-उतार शेअर बाजाराप्रमाणेच राहत असल्याने मोठय़ा प्रमाणात त्याची खरेदी-विक्री होत असून बँक क्रेडिट कार्डवर ही उलाढाल दररोज ऑनलाइन केली जात आहे.