बुलडाणा जिल्ह्याची वीज हानी १८ टक्क्यांवर; १५ टक्क्यांवर आणण्याचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:33 AM2018-02-03T00:33:02+5:302018-02-03T00:36:45+5:30
बुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी रोखण्यासाठी वीज रोहित्रावर लावण्यात आलेल्या मीटरचीही उपयोगिता आता सिद्ध होत आहे.
ब्रह्मनंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मोठय़ा प्रमाणावरील वीज गळती आणि वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने सध्या जिल्ह्यात मोहीम उघडली असून, जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यांवर आली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत वीज गळतीचे प्रमाण ११.२२ टक्क्याने कमी झाल्याचे दिसून येते. गळती व वीज चोरी रोखण्यासाठी वीज रोहित्रावर लावण्यात आलेल्या मीटरचीही उपयोगिता आता सिद्ध होत आहे.
महावितरणच्या वितरण व्यवस्थेतील गळती आणि वीजचोरी यामुळे वीज हानी निर्माण होते. प्रत्यक्ष पुरविलेली वीज आणि त्याचा मिळालेला मोबदला यात येणारा फरक, हा महावितरणची हानी समजली जाते. वीज हानी कमी करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडून आदेश देण्यात आले असून, त्यानुसार महाराष्ट्रभर महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. वीज हानी टाळण्याकरीता वीज चोरी रोखणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने राज्यभर महावितरणच्या पथकांतर्गत वीजचोरीच्या विरोधात मोहिमा राबविण्यात येत आहेत. गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यात वीज हानी टाळण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न झाले असून, जवळपास १ हजार १९९ वीज चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वीज वितरणातील घट शोधण्यावरही भर देण्यात आला असून, वितरण रोहित्रांना त्याचप्रमाणे फिडरवरही मीटर बसविण्यात आले. गळती कमी करणे आणि वीज चोरी रोखण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात आल्याने सध्या जिल्ह्याची वीज हानी १८.४८ टक्क्यावर आली आहे. त्यामध्ये खामगाव विभागांतर्गत २१.0२ टक्के, मलकापूर १५.७६ टक्के आणि बुलडाणा १७.३0 टक्क्यावर वीज हानी आहे. ऑक्टोबर २0१५ ते मार्च २0१६ मध्ये जिल्ह्याची २९.७ टक्क्यांवर होती. ती आता १८.४८ टक्क्यावर आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ११.२२ टक्क्याने वीज गळती कमी झाली आहे.
वीज चोरट्यांकडून पावणे दोन कोटी वसूल
वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी वीज हानी रोखण्यावर भर दिला. जिल्ह्यात वीज चोरट्यांवर धडक कारवाई करून गेल्या दहा महिन्यात १ हजार १९९ वीज चोरट्यांकडून १ कोटी ७३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच १८, १९ व २0 जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीतसुद्धा जिल्ह्यात वीज चोरट्यांविरूद्ध धडक कारवाईची मोहीम राबविण्यता आली होती. यामध्ये तीन दिवसात ५१५ वीज चोरट्यांवर करवाई करण्यात आली.
गळती मार्चपर्यंत १५ टक्क्यांवर
वीज गळती सध्या १८.४८ टक्क्यावर आली असून, वीज गळतीचे हे प्रमाण मार्चपर्यंत १५ टक्क्यांवर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहे. त्यासाठी महावितरणचे विशेष पथकही प्रत्येक भागात काम करत असून, दोन महिन्यात वीज गळतीचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विजेचा पुरवठा करताना होणारी गळती आणि चोरी रोखण्यावर सध्या भर दिला जात आहे. त्यासाठी वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित वीज बिल भरणार्या ग्राहकांचाही महत्त्वाचा वाटा असतो. जिल्ह्याची वीज हानीची टक्केवारी १८.४८ असून, दोन महिन्यात आणखी वीज हानी कमी होईल. - गुलाबराव कडाळे, अधीक्षक अभियंता,
महावितरण कंपनी, बुलडाणा