रामदासपेठ ठाणेदाराला न्यायालयाची नोटीस
By admin | Published: July 3, 2014 01:33 AM2014-07-03T01:33:42+5:302014-07-03T01:41:43+5:30
रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांना आरोपीला वारंट बजावल्याप्रकरणी न्यायालयाची नोटीस
अकोला: आरोपीला वारंट बजावल्यानंतर त्याची तामिल न करण्यासाठी ५0 हजार रुपयांच्या मागणी प्रकरणी ठाणेदार विनोद ठाकरे यांना निलंबित केल्याचे प्रकरण शांत होत नाही, तोच दुसरे प्रकरण त्यांच्या अंगलट येणार आहे. रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांना आरोपीला वारंट बजावल्याप्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावून १६ ऑगस्टपर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. अकोला होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सैफुद्दीन अहमद यांनी महाविद्यालयातील प्रा. कल्पना भिसे यांच्या प्राचार्यपदाच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले. याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीनुसार न्यायालयाने व्ही.एल. खंडारे, डॉ. किशोर मालोकार, डॉ. महावीर जयस्वाल डॉ. कल्पना भिसे यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी या सर्वांविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६८, ४७१(३४) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी डॉ. महावीर जयस्वाल हे वगळता इतर आरोपींना जामीन मिळाला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान डॉ. जयस्वाल हे अनुपस्थित राहत असल्याने न्यायालयाने पोलिसांच्या माध्यमातून त्यांना वारंट बजावले; परंतु पोलिसांनी आरोपी डॉ. जयस्वाल यांच्याकडून आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवत न्यायालयाच्या वारंटची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी पाथोडे यांनी ठाणेदार यांना नोटीस पाठवून १६ ऑगस्टपर्यंत आपली बाजू मांडण्यास बजावले आहे. याचिकाकर्त्याने डॉ. कल्पना भिसे याच महाविद्यालयात १९८८ मध्ये शिक्षण घेत होत्या, अशी माहिती न्यायालयाला दिली.