शेगावातील डायलिसीस विभाग राज्यात प्रथम
By admin | Published: August 13, 2016 01:11 AM2016-08-13T01:11:56+5:302016-08-13T01:11:56+5:30
खारपानपट्टय़ातील गावांत किडनी आजारग्रस्तांची संख्या वाढती; ा साडेतीन वर्षांंत ८६८९ रुग्णांवर डायलिसीस.
गजानन कलोरे
शेगाव (जि. बुलडाणा), दि. १२ : येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात डॉक्टर व कर्मचार्यांच्या उपचारासाठीच्या तत्परतेमुळे गेल्या साडेतीन वर्षांंत ८६८९ रुग्णांवर डायलिसीस करण्यात आले आहे. यामुळे येथील डायलिसीस विभाग संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकावर सेवा देणारे ठरले आहे. शेगाव तालुक्यासह नजीकच्या संग्रामपूर, जळगाव जामोद हे बुलडाणा जिल्ह्यातील तालुके भौगोलिकदृष्ट्या खारपाणपट्ट्यामध्ये येतात. या तालुक्यात पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने व पिण्यासाठी क्षारांचे पाण्याचाच उपयोग करावा लागत असल्याने किडनी आजारग्रस्तांची संख्या वाढती आहे. किडनी आजारामुळे या तालुक्यात अनेकांचे बळी गेले आहेत. किडनीच्या आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता या मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या प्रयत्नाने फेब्रुवारी २0१३ मध्ये शेगाव येथे सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात डायलिसीस युनिटची सुरुवात झाली. या युनिटची सुरुवात झाल्यापासून ऑगस्ट २0१६ अशा साडेतीन वर्षांंच्या कालावधीत
या युनिटमध्ये ८,६८९ रुग्णांची डायलिसीस सायकल पूर्ण करण्यात आली आहे. रुग्णांचे डायलिसीस हे राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत या रुग्णालयात मोफत केले जाते. या युनिटमध्ये सद्यस्थितीत सहा डायलिसीस मशीन आहेत. यापैकी चार मशीन ह्या निगेटिव्ह रुग्णांकरिता व दोन मशीन ह्या पॉझिटिव्ह रुग्णांकरिता आहेत. या युनिटमध्ये ३५ रुग्णांचे आजमितीस हेमोडायलिसीस सुरु आहे, तर २९ रुग्ण हे प्रतीक्षा यादीत आहेत. आणखी दोन मशीनसुद्धा येथे सुरु होणार आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित यांचे मार्गदर्शनाने कमी कर्मचारी वर्ग असतानाही येथील अधिकारी व कर्मचारी डायलिसीस रुग्णांना वेळेवर चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे. येथील रुग्णालयामध्ये किडणी रुग्ण तपासणीकरिता अकोला येथील डॉ.निखील किबे हे नियमित सेवा देत आहेत.
शेगावसारख्या ठिकाणी रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने येथे डायलिसीससाठी येणार्या रुग्णांची संख्या वाढती आहे. यामुळे सन २0१६ या वर्षात येथील डायलिसीस युनीट हे राज्यातून प्रथम क्रमांकाचे ठरले आहे.
- डॉ.प्रेमचंद पंडित
वैद्यकीय अधीक्षक, सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव