अकोल्यातील कॅन्सरग्रस्त चिमुकल्या क्रिशासाठी डॉक्टर बनले देवदूत; मोफत केली शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:34 PM2018-01-15T14:34:12+5:302018-01-15T14:37:40+5:30
अकोला : बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला.
अकोला : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची... मजुरीला गेल्याशिवाय घरातील चूल पेटत नाही... अशा परिस्थितीत क्रिशा चक्रनारायण या दोन वर्षाच्या चिमुकलीच्या किडनीवर कॅन्सरची गाठ आली. शस्त्रक्रिया करण्यासाठी दीड लाख रुपयांची गरज होती; परंतु एवढी रक्कम आणणार कोठून, असा प्रश्न क्रिशाच्या वडिलांना पडला. ‘लोकमत’ने ‘मदतीचा हात’ उपक्रमांतर्गत चिमुकल्या क्रिशाच्या वेदना समाजासमोर मांडल्या आणि शेकडो हात मदतीसाठी धावून आले. बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला.
श्रीमंती मोजायची असेल, तर नोटा मोजू नका... कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जण येतात, हे मोजले पाहिजे. अशीच काहीशी प्रचिती क्रिशाच्या आजारीपणात पाहायला मिळाली. किडनीच्या कॅन्सरशी लढणाºया चिमुकल्या क्रिशा चक्रनारायण हिला दानशूरांनी मदत करून माणुसकीचा परिचय दिला. यावलखेड येथील क्रिशा हिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. वडील मजुरी काम करतात. अशातच क्रिशाला किडनीवर कॅन्सरची गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढावी लागेल; अन्यथा कॅन्सर पूर्ण शरीरात पसरेल. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. आता पैसे कोठून आणावे, असा प्रश्न वडिलांना पडला. ‘लोकमत’ने मदतीचा हात उपक्रमांतर्गत चिमुकल्या क्रिशाच्या वेदना समाजासमोर मांडल्या आणि पाहता पाहता शेकडो हात क्रिशाच्या मदतीसाठी पुढे आले. दोन दिवसांपूर्वी मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. पराग टापरे यांनी पुढाकार घेऊन क्रिशावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या किडनीवरील कॅन्सरची गाठ काढली. सहृदयी समाजाची आर्थिक मदत आणि सुनील वाठोरे, आरोग्यसेवक मनोज बोबडे, मदन तायडे, नरेंद्र गावंडे, दीपक पांडव यांच्या प्रयत्नांमुळे चिमुकलीला जीवनदान मिळाले. आता क्रिशाची प्रकृती ठणठणीत असून, तिच्याच नव्हे, तर कुटुंबीयांच्यासुद्धा चेहºयावर आनंद ओसंडून वाहत आहे.
आ. शर्मा, माजी आ. भदे यांच्याकडूनही आर्थिक मदत
आमदार गोवर्धन शर्मा व रामनवमी शोभायात्रा समितीने क्रिशाच्या घरी जाऊन २१ हजार रुपयांची मदत तिच्या वडिलांच्या सुपूर्द केली. यासोबतच माजी आमदार हरिदास भदे यांनी तीन हजार रुपयांची मदत टापरे यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिच्या वडिलांच्या सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबतच जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे व भारिप-बमसंचे पदाधिकारी उपस्थित होते.
यांनी केली आर्थिक मदत
क्रिशाच्या शस्त्रक्रियेसाठी दादाराव गोगटे, राजेंद्र डिगांबर, देवयानी थोरात, मूर्तिजापूर येथील रामटेके, संत ज्ञानेश्वर विद्यालय, बी.एस. मोरडे, राम घाटोळ, रामराव वाहुरवाघ, विनीता म्हसाळकर, गोपाल बारड, संदीप शेंडगे, मगन ऊर्फ मंगेश वीसपुते, सुभाष लंगोटे यांच्यासह अनेकांनी आर्थिक मदतीचा हात दिला. या सहृदयी दानशुरांमुळे ६0 हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली. या आर्थिक मदतीतून क्रिशावर औैषधोपचार व महागड्या इंजेक्शनचा खर्च भागविला जाणार आहे.