बाळापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट!

By admin | Published: July 17, 2017 02:59 AM2017-07-17T02:59:13+5:302017-07-17T02:59:13+5:30

तिबार पेरणीचे संकट कायम, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

Drought in Balapur taluka! | बाळापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट!

बाळापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : बाळापूर तालुक्यात सध्या अधूनमधून रिमझिम रिमझिम पाऊस पडत असला, तरी अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. रिमझिम पावसाने पिकाची स्थिती सध्या बरी वाटत असली, तरी गुरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार असून, कोरडवाहू शेतकरी संकटात असल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.
तालुक्यात काही भागात निंदन, डवरणी, फवारणीची कामे सुरू आहेत. दमदार पाऊस झाला नसल्याने १५ जुलैपर्यंत १४० मि.मी. पाऊस झाला. १५ जुलै २०१६ रोजी ३०६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून गेल्या वर्षीपेक्षा निम्मा पाऊसही अद्यापपर्यंत झाला नसल्याचे दिसत आहे. सध्या पेरणीला एक महिन्याहून अधिक कालावधी झाला असून, पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरी, शेतमजुरांना कामे नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील ९० टक्क्यापेक्षा जास्त शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षापासून सातत्याने पावसाचे प्रमाण घटत आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षीच शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. जून, जुलै महिन्यात राखून नियोजन केलेला गुरांचा चारा संपुष्टात आल्याने पावसाळ्यात गुरांना वैरणाची व विहिरी, बोअरवेल्सना पाण्याची टंचाई जाणवत आहे. तालुक्यात सिंचित क्षेत्र नसल्याने ९५ टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. तालुक्यातील सात सर्कलमध्ये सर्वात जास्त पाऊस वाडेगाव सर्कलमध्ये १८५ मि.मी., बाळापूर १७५ मि.मी., व्याळा १३८ मि.मी., पारस १३७ मि.मी., उरळ ९७ मि.मी., निंबा १७५ मि.मी., हातरुण ६५ मि.मी. पावसाची नोंद आहे. तालुक्यातच सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नसल्याने सातही महसूल सर्कलमध्ये पावसाचे आकडे वेगवेगळे आहेत.

आगर परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या!
- परिसरात ढगाळ वातावरण असले, तरी पावसाची एकही सर कोसळत नसल्याने पाऊस फक्त खो देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.परिसरातील शेतकऱ्यांना मागीलवर्षी शेतीमध्ये बऱ्यापैकी उत्पन्न झाल्याने चालू वर्षासाठी जानेवारी २०१७ पासूनच शेतीची मशागत करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बी-बियाण्याची खरेदी करून ठेवली. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे मृग नक्षत्रातच तिफण बाहेर काढून ८ ते १२ जून रोजी पडलेल्या समाधानकारक पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी कपाशीसह मूग, उडीद, सोयाबीन पिकाची पेरणी केली.
- या दरम्यान काही टक्के पेरण्या होताच पावसाने दडी मारली. पुन्हा ८ जुलै रोजी तुरळक पाऊस पडला. पेरण्या झालेल्या काही श्ोतातील ६० टक्केहून अधिक बियाणे अद्याप उगवले नाही. मागील चार दिवसांपासून ढगाळी वातावरण असूनसुद्धा पाऊस पडत नाही. यामुळे शेतकरी पुरता खचला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे पीक पेऱ्यांचे नियोजन बदलले असून, घरात आणून ठेवलेल्या बियाण्याचे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अद्यापपर्यंत २० टक्के पेरण्या थांबल्या असल्याने शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Drought in Balapur taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.