अकोला शहर विभागात आठ महिन्यांत १ कोटी ११ लाखांची वीज चोरी उघड
By Atul.jaiswal | Published: January 20, 2019 04:08 PM2019-01-20T16:08:55+5:302019-01-20T16:13:17+5:30
अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ या आठ महिन्यात राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधी मोहिमेत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली.
अकोला: महावितरणच्याअकोला शहर विभागात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ या आठ महिन्यात राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधी मोहिमेत तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली. अकोला शहरातील तीनही उपविभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार एकूण २५९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे . यामध्ये ११जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून, ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आलेले आहेत.
वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात कारवाईचे सत्र सातत्याने सुरु आहे. महावितरणच्या अकोला शहर विभागात १ जून २०१८ पासून आतापर्यंत जवळपास आठ महिन्यामध्ये वेळोवेळी वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवून आतापर्यंत २५५ पेक्षा जास्त वीज चोरांविरूध कारवाई करून ११लाख ६६ हजार ५५७ युनिट्सची वीज चोरी व गैरवापर उघड केला आहे. सदर वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात आलेल्या १ कोटी ११ लक्ष रुपयांच्या बिलापोटी १८५ ग्राहकांकडून ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. तसेच १५० ग्राहकांकडून वीज चोरी प्रकरणी नियमाप्रमाणे तडजोड करून रु. १२ लक्ष रुपये रकमेचा भरणा शासनास केला आहे. सदर कारवाई अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांचे मार्गदर्शनाखाली अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांचे नेतृत्वात अतिरिक्त कार्यकारी अभियंते मोरेश्वर सिरसे, अजितसिंह दिनोरे व गणेश महाजन तसेच भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता संतोष राठोड यांच्या पथकातील अभियंते कर्मचारी व जनमित्रांनी केली आहे.
कारवाईचा धडका सुरुच राहणार
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण प्रशासन गंभीर आहे. शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून, यापुढे सुद्धा गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने धडक मोहिम राबवूनआकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत.
नागरिकांनी वीजचोरी, वीजेचा अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घ्यावी.प्रामाणिकपणे वीज वापर करून तसेच नियमितपणे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
- प्रशांत दाणी, कार्यकारी अभियंता, अकोला शहर विभाग