पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा - शिवसंग्राम
By admin | Published: July 14, 2017 01:11 AM2017-07-14T01:11:50+5:302017-07-14T01:11:50+5:30
बाळापूर : पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा पारस प्रकल्पासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.
बाळापूर : पारस प्रकल्पाचा विस्तार करा, अन्यथा पारस प्रकल्पासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पारस प्रकल्पाच्या विस्तारासाठी १२५ हेक्टर शेतजमीन १४१ शेतकऱ्यांकडून संपादित केली आहे. याबाबत मागील महिन्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पाला भेट देऊन पारस येथील प्रकल्पाची पाहणी करून अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पारस येथे ६६० मेगावॅटचा प्रकल्प करण्याचे जाहीर केले होते; परंतु १० जुलै रोजी मंत्रालयातील ऊर्जामंत्र्यांच्या सदनात पारस येथे औष्णिक वीज प्रकल्पाऐवजी २५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला आहे. यामुळे हा सौर ऊर्जा प्रकल्प पारस प्रकल्पाच्या व शेतकऱ्यांच्या बेरोजगाराच्या अहिताचा आहे. भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या व आता वीज प्रकल्पाने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन आता मागे पडणार आहे, त्यामुळे भविष्यात या कुटुंबाची उपासमारी होणार आहे.
पारस येथे पूर्वीच ५०० मेगावॅटचा प्रकल्प सुरू आहे. नव्याने होणाऱ्या ६६० मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी मन नदीपात्रात दोन मोठी धरणे आहेत. त्याचं पुरेसं पाणी जमीन, रेल्वे व अधिकाऱ्यांची पुरेशी निवासस्थाने असताना शासन मनमानी करून पारस प्रकल्प येथे ऊर्जा प्रकल्पाऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प पुढे करीत आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी अकोला येथे घोषणा केल्यानंतर ६६० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्पाऐवजी आता २५ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प करण्याची चर्चा करण्यात येत आहे.यापूर्वीही पारस येथील एक प्रकल्प भुसावळ येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. केवळ सौर उर्जेचा प्रकल्प झाल्यास त्यापासून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही. हा प्रकल्प जिल्ह्याच्या अहिताचा ठरणार असल्याने शासनाने जाहीर केलेल्या औष्णिक प्रकल्पाच्या कामास प्रारंभ करावा, अन्यथा १४१ शेतकऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्यावतीने शिवसंग्राम न्यायालयात जनहित याचिका दाखल करून जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे.
कृ ती समितीच्या निर्णयानंतरच निर्णय -सिरस्कार
बाळापूर : पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबत कृ ती समितीने पारस औष्णिक वीज केंद्राबाबत निर्णय दिला होता. आता नव्याने राज्य शासन या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन असून, त्यावर पारस कृ ती समितीची पुढील आठवड्यात बैठक होऊन या बैठकीतून जनहितार्थ पुढील निर्णय घेऊ, असे आमदार बळीराम सिरस्कार यांनी सांगितले. भूसंपादित शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत व त्यांच्या रोजगाराबाबत शासनासोबत कृ ती समितीच्यावतीने घेतलेले निर्णय ठेवून त्यावर आपण ठाम राहू, असेही सिरस्कार यांनी सांगितले.
केवळ सौर ऊर्जा प्रकल्प केल्यास विरोध -तायडे
बाळापूर : काँग्रेस आघाडी सरकारने १२०० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने शासन स्तरावरून योजना आखून तरतूद केली होती. युती सरकारने पारस येथे औष्णिक वीज प्रकल्पाचे विस्तारीकरण करून ६६० मेगावॅट वीज प्रकल्प सुरू करावा. त्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्प केल्यास शासनाचे स्वागत करू; पण ६०० मेगावॅटऐवजी केवळ २५ मेगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जा प्रकल्पातून केल्यास आम्ही विरोध करू. त्यासाठी १४१ शेतकऱ्यांची व कृ ती समितीची, बेरोजगारांची संयुक्त बैठक घेऊन जनआंदोलनाची दिशा ठरवू, असे काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रकाश तायडे यांनी सांगितले.