सातपुड्याच्या पायथ्याशी वाघ असल्याचे निष्पन्न
By admin | Published: July 7, 2017 01:42 AM2017-07-07T01:42:10+5:302017-07-07T01:42:10+5:30
दोन दिवस रेस्क्यू आॅपरेशन राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे. या पायथ्याशी असलेल्या मक्रमपूर येथील शेतशिवारात वाघ असल्याचे निष्पन्न झाल्याने ६ व ७ जुलै रोजी वन विभागातर्फे रेस्क्यू आॅपरेशन राबविल्या जात आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी वान, अंबाबरवा, नरनाळा अशी अभयारणे आहेत. या अभयारण्यात वाघांच्या अधिवासाचे ठिकाण ठरले आहे; परंतु पाण्याच्या किंवा खाद्याच्या शोधार्थ वाघांनी आपला मोर्चा गावालगत असलेल्या शेतशिवारात वळविला असल्याचे दिसून येत आहे. ५ जुलै रोजी मौजे मक्रमपूर येथील नारायण भीमराव सोनोने यांच्या शेतात वन्य प्राणी वाघ असल्याचे मिळालेल्या ठशांवरून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी ६ जुलै रोजी परिसराची वनाधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी केली. शिवाय ७ जुलै रोजीसुद्धा रेस्क्यू आॅपरेशन राबविल्या जाणार आहे. या दरम्यान गावातील लोकं वाघ पाहण्याकरिता गर्दी करण्याची शक्यता असल्याने नियंत्रण करण्याकरिता अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा बंदोबस्तसुद्धा वनपरिमंडल अधिकारी ए.एन. बावणे यांनी मागविला आहे. शेतकऱ्यांत व शेतमजुरात वाघ दिसल्याच्या माहितीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत वाघाला पिटाळून लावण्याकरिता वन विभागाचे पथक रेस्क्यू आॅपरेशन राबवित आहेत.