दुकानाचा बेकायदा ताबा करणार्यांवर फौजदारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:09 PM2017-11-22T23:09:03+5:302017-11-22T23:15:36+5:30
मोहम्मद अली रोडवरील दुकानामध्ये बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून बेकायदा ताबा केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी ८ ते १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोहम्मद अली रोडवरील दुकानामध्ये बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून बेकायदा ताबा केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी ८ ते १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दखल घेऊन संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत हे विशेष.
अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. त्यांनी अब्दुल हबीब यांच्या वडिलांना व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमले होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अब्दुल हबीब हे दुकानाचे काम सांभाळत असतानाच दुकानाचे मालक, अब्दुल हबीब आणि मूळ भाडेकरू या तिघांमध्ये दिवाणी न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खटला सुरू आहे. दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, मालकाने हे दुकान काही लोकांना विकले. मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्या व्यक्तीने मंजूर इलाही, सफवान, सलमान आणि गुंड प्रवृत्तीच्या ५ ते ६ युवकांना सोबत घेऊन बुधवारी रात्री दुकानाचे कुलूप तोडले आणि दुकानाचा बेकायदा ताबा घेतला. एवढेच नव्हे, तर दुकानात घुसून दुकानामधील फर्निचर, आठ फ्रिज, सोडा, लेमन बनविण्याची मशीन, बर्फ बनविण्याची मशीन, कॉम्प्रेसर, बॉटल-कॅरेट १00 नग, दोन मोबाइल व महत्त्वाचे दस्तावेज असा एकूण ४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल या युवकांनी पळविला. या प्रकरणाची तक्रार अब्दुल हबीब अब्दुल सलाम यांनी सिटी को तवाली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून सदर आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४६१, ३८0 आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल
या प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी तपासले. त्यानंतर समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे तसेच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर गुन्हे दाखल केले आहेत.
संघटित गुन्हेगारीला चपराक
संघटित गुन्हेगारांनी या परिसरातील दुकानांवर बेकायदा ताबा घेण्याचे सत्रच सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे; मात्र सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात यामधील काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने संघटित गुन्हेगारांना चपराक बसली.