माजी राज्यमंत्री, सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:55 PM2018-08-10T18:55:21+5:302018-08-10T19:04:52+5:30
अकोला : राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच अकोल्यातील जेष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
अकोला : राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच अकोल्यातील जेष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अकोल्यासह अमरावती विभागाच्या राजकारण व सहकारक्षेत्रावर वसंतराव धोत्रे यांची छाप होती . त्यांनी १९८५ ते ९० दरम्यान अकोल्याच्या बोरगावमंजू विधानसभा मतदार संघातून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. ते १९८६ ते १९८८ सहकार खात्याचे राज्यमंत्री होते. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख आहे. अकोला बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सोसायट्यांवर त्यांची सत्ता आहे. यासोबतच अकोला जिल्हा बँकेवरही त्यांची पकड होती. विदभार्तील सर्वात मोठया अशा शिवाजी शिक्षण संस्थेचे ते १० वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत. गेल्या वर्षी या संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या गटाची सत्ता स्थापन झाल्याने धोत्रे यांचे ‘शिव’ परिवारातील महत्व पुन्हा वाढले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांचे ते सख्खे चुलतभाऊ होत. शरद पवारांचे विदर्भातील कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्यांना साथ देणाऱ्या विदर्भातील प्रमुख नेत्यांत त्यांचा समावेश होता. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सहकार क्षेत्रातला एक मार्गदर्शक हरविल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये आहेत.