भरधाव ट्रकच्या धडकेत चार वारकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:04 AM2018-02-06T02:04:38+5:302018-02-06T02:05:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर/वाडेगाव : श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे निघालेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणार्या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्हय़ातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.१५ वाजता घडलेल्या या अपघातात चार भाविक ठार, तर सहा गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा कापसे या गावातील १७0 भाविकांची पायदळ दिंडी शेगाव येथे जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी निघाली. या दिंडीसोबत एक मालवाहू (क्रमांक - एम. एच. ३७ बी. ३६८ ) वाहनही होते. या मालवाहू वाहनात ४ वारकरी बसलेले होते. दिंडी सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी ही अकोला जिल्हय़ातील पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यावर काही काळ विसाव्या साठी थांबली होती. यावेळी मागून आलेल्या ट्रकने (क्रमांक आर. जे. १३ जी. सी. 0७८२) पायदळ दिंडीसोबत असलेल्या या मालवाहू वाहनास धडक दिली. धडक दिल्यामुळे भाविकांचे वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले; परंतु वाहनातील चारही वारकरी रस्त्यावरच पडले. धडक दिल्याने अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्यावर पडलेल्या या वारकर्यांच्या अंगावर उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली हे वारकरी दबल्याने चार भाविक जागीच ठार झाले, तर मालवाहु वाहनाजवळ विसावा घेत असलेले सहा भाविकही या अपघातात जखमी झाले.
मृतकांमध्ये काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश धनाजी कापसे, लीला कापसे, रामजी काकडे (सर्व रा. उमरा-कापसे) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये बळीराम कापसे (६२), शारदाबाई काशीनाथ कापसे (५0), किसनबाई साबळे (६0), वैष्णवी रमेश कापसे (१८), स्नेहल दिलीप कापसे (११), निकीता विठ्ठल कापसे (१३) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच वाडेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन दबलेल्या भाविकांना बाहेर काढले. बाळापूर पोलिसांनीही घटनास्थळाला भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलविले.