वल्लभनगर, केळीवेळी परिसरात गारपीट
By admin | Published: October 7, 2014 01:50 AM2014-10-07T01:50:34+5:302014-10-07T02:12:01+5:30
वादळी वा-यामुळे टीनपत्रे उडाली, घरांची पडझड.
वल्लभनगर (अकोला): विजांचा कडकडाट व वादळी वार्यासह आलेला परतीचा पाऊस आणि गारपिटीने सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी अकोला तालुक्यातील वल्लभनगर व आकोट तालुक्यातील केळीवेळी परिसराला झोडपून काढले. वादळी वार्यामुळे अनेकांच्या घरांवरची टीनपत्रे उडून गेली, तर काही घरांची पडझड झाली. गत काही दिवसांपासून प्रचंड उकाडा व तापमान वाढल्याच्या पृष्ठभूमीवर शेतकर्यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा असताना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वल्लभनगर, निंभोरा, हिंगणा तामसवाडी, सांगवी खुर्द, कासली खुर्द, कासली बुद्रुक, केळीवेळी, रोहणा, काटी, पाटी आदी गावांत पावसाने दमदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा व गारपिटीसह अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे दहा मिनीट बोराच्या आकाराएवढी गार कोसळल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. वार्याचा वेग एवढा प्रचंड होता की, अनेकांच्या घरांवरची टीनपत्रे उडाली. वृक्ष उन्मळून पडली, तर काही जणांच्या घरांची पडझड झाली. केळीवेळी येथे विद्युत तारा तुटून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. निंभोरा येथील वामनराव इतवारे व कासली बु. येथील महादेवराव सोळंके यांचे घर कोसळले. कासली बु. येथील नागोराव इंगळे यांच्या घराची भिंत कोसळली, तर ग्रामपंचायत कार्यालयावरचे संपूर्ण टीनपत्रे उडून गेली. गारपीट झाली तेव्हा परिसरातील शेतकरी शेतात काम करीत होते. अचानक झालेल्या गारपिटीमुळे अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.