७ व ८ मे रोजी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 03:34 PM2019-05-05T15:34:00+5:302019-05-05T15:34:23+5:30
६ मे रोजी तुरळक तर ७ व ८ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला.
अकोला : अकोल्याचे कमाल तापमान तीन दिवसात घटले असून, शनिवार,४ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४२.० अंश होते. दरम्यान, ६ मे रोजी तुरळक तर ७ व ८ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला.
कमाल तापमानात घट झाल्याने असह्य उकाडा, तापमानापासून अकोलेकरांना दिलासा मिळाला. मागच्या आठवड्यात विस्कळीत झालेले जनजीवन तीन दिवसात पूर्वपदावर आले. बाजारपेठ,रस्त्यावर वर्दळ वाढली. दरम्यान, शनिवारी विदर्भात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४५.० अंश करण्यात आली. त्या खालोखाल वर्धा ४४.१,नागपूर ४३.३,अमरावती ४२.८,अकोला ४२.०, यवतमाळ ४१.५, गोंदिया ४१.० तर बुलडाणा येथे सर्वात कमी ३८.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मागील चोविस तासात शनिवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली, तर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.