विमा काढण्यात आशा स्वयंसेविका उदासीन
By admin | Published: October 29, 2016 02:49 AM2016-10-29T02:49:31+5:302016-10-29T02:49:31+5:30
अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के स्वयंसेविकांनी विमाच काढला नाही!
संदीप वानखडे
अकोला, दि. २८- गावोगावी जाऊन महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात विमा काढण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला आशा स्वयंसेविकांचा मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील केवळ २५ टक्के आशा सेविकांचा विमा काढण्यात आला असून ७५ टक्के सेविकांना अजूनही विम्याची प्रतीक्षा आहे.
ग्रामीण भागावर कार्यरत आशा स्वयंसेविकांना वेळोवेळी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी स्थानिक वाहनाने ये-जा करावी लागते.
या सेवेदरम्यान स्वयंसेविकांच्या मृत्यूच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे, ग्रामीण पातळीवर काम करणार्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना विम्याचे कवच मिळावे, या उदात्त हेतूने शासनाने विमा योजना सुरू केली आहे.
त्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्यासाठी ९.१७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीतून नियुक्त सर्व आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांना विम्याचा लाभ मिळणार आहे; मात्र विमा काढण्यात पातूर आणि बाश्रीटाकळी तालुक्यात प्रतिसादच मिळाला नाही तर अकोटात ६, अकोला तालुक्यात ३७, बाळापुरात ४३ आशा सेविकांनीच विमा काढला आहे. मूर्तिजापूर तालुक्यात मात्र सर्वच आशा सेविकांनी लाभ घेतला आहे.
१२ रुपयात विमा
या विमा योजनेंतर्गत केवळ १२ रुपयांमध्ये हा दोन लाखांचा विमा काढण्यात येत आहे. ही रक्कम आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यातून कपात केली जात असून त्याचा परतावा त्यांना शासनाकडून देण्यात येत आहे. १८ ते ५0 वर्षाच्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांचा विमा काढण्यात येत आहे. या विम्यासाठी आशाचे बँक खाते आधार कार्ड क्रमांकासह संलग्न करणे गरजेचे आहे. बँक खाते नसल्यास आधारकार्डची प्रत जमा करून विमा काढला जाणार आहे.
बँकामध्ये निघतो विमा
बँकेमध्ये आशा सेविकांनी जाऊन विमा काढण्यासाठी संमती द्यावी लागते, त्यानंतर बँके कडून १२ रुपयांची कपात करण्यात येते. तर यासंबंधीचा पुरावा दिल्यास शासनाकडून १५ रुपये जमा करण्यात येतात. मध्यंतरी काही काळासाठी योजना बंद होती. त्यामुळे अनेक बँक शाखांनी प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा सुरू झालेली आहे.
आशा सेविकांच्या अडचणी जाणून घेतल्या. विम्यापासून वंचित राहिलेल्यांना आशा सेविकांनी विमा काढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बँकांकडूनही आता प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच सर्व आशा सेविकांचा विमा काढण्यात येईल. आशा सेविकांनीही विमा काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-सचिन उनवणे, जिल्हा समूह संघटक, आशा युनिक अकोला.