कापसावर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव; बियाणे कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:33 AM2017-12-26T02:33:14+5:302017-12-26T02:33:54+5:30
अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळी प्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
गुलाबी बोंडअळ्यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील ९0 टक्के नुकसान झाल्याने शेकडो शेतकर्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तालुका बीज निरीक्षक समितीने पाहणी करू न जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार तक्रार निवारण समितीने जिल्हय़ातील बीटी कापूस क्षेत्राची पाहणी व तपासणी केली. त्यामध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाल्याचे समोर आल्याने बीटी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध अकोल्यात गुन्हे दाखल केले जाणार असल्याने वृत्त आहे. त्यासाठीची तयारी कृषी विभागाने केल्याचे समजते.
बोंडअळी प्रतिरोधक क्षमता काही दिवसांचीच!
कपाशीचे पीक १८0 ते २00 दिवसांचे आहे; पण बीजी-१ व बीजी-२ कापसामध्ये बोंडअळीला प्रतिरोधक जिन केवळ ९0 ते १२0 दिवसांचाच आहे. दरम्यान, यावर्षी सुरुवातीपासूनच पूर्वमोसमी व खरीप हंगामातील कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे शेतकर्यांनी तक्रारीत नमूद केले. बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकर्यांची ही फसवणूकच केल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यासोबत संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावे, यावर शेतकर्यांचा जोर होता. जिल्हा तक्रार निवारण समिती पथकाच्या तपासणीतही हे तथ्य आढळून आल्याने कृषी विभागाच्यावतीने गुन्हे दाखल करणार आहे. सतत तीन दिवस सुटी आल्याने २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वृत्त आहे.